मुंबई- नवरात्री आणि नवरात्रीच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच नवमीच्या दिवशी येणार दसरा हा सण देशाच्या प्रत्येक राज्यात साजरा केला जातो. काही ठिकाणी फक्त दसरा धुमधडाक्यात साजरा केला जातो पण काही ठिकाणी नवरात्रीचे सगळे दिवस धुमधडाक्यात साजरे केले जातात. कुटुंबातील सदस्य एकत्र येत दुर्गा देवीची पूजा करतात. चामुंडा देवीने महिषासुराशी युद्ध करून दस-याच्या दिवशी त्याचा वध केला अशी कथा आहे. तसंच विजयादशमीच्या दिवशी रामने रावणावर मिळविलेला विजयही साजरा केला जातो.
भारतात नऊ विविध पद्धतीने दसरा साजरा केला जातो.
पश्चिम बंगालमधील दूर्गा पूजापश्चिम बंगालमध्ये दुर्गापूजेला विशेष महत्त्व आहे. वाईटावर चांगल्या गोष्टीचा कायम विजय होतो हा संदेश देणारा नवरात्रोत्सव बंगालमध्ये दरवर्षी अतिशय अनोख्या पद्धतीने साजरा केला जातो. महाराष्ट्रात गणेशोत्सवात ज्याप्रमाणे देखावे आणि सजावट असते. त्याचप्रमाणे पश्चिम बंगालमध्ये विविध मंडळांच्या देवींची सजावट कऱण्यात येते. बंगालमध्ये नवरात्रीच्या सहाव्या दिवसापासून सुरु होणारा हा सण दहाव्या दिवशी संपतो. यामध्ये सार्वजनिक ठिकाणी मोठमोठे मंडप घातले जातात आणि काही संदेश देणारे तर काही दिव्यांचा वापर करुन देखावे साकार केले जातात. हे मंडप नागरिकांना पाहण्यासाठी खुले असल्याने पश्चिम बंगालमधील नागरिक त्याचा आनंद लुटताना दिसतात. पश्चिम बंगालमध्ये नवरात्रीच्या दहाव्या दिवशी म्हणजेच दसऱ्याला विवाहित महिला 'सिंदूर खेळ' थेळतात. यामध्ये महिला एकमेकींना तसंच दूर्गा देवीला सिंदूर लावतात. जशी रंगानी होळी खेळली जाते तसाच हा सिंदूर खेळ खेळला जातो.
नवी दिल्लीत सादर करतात रामलीला दसऱ्याच्या दिवशी होणारं सेलिब्रेशन दिल्लीतही त्याच उत्साहाने साजरा केला जातो. दिल्लीतील रामलीला मैदानावर प्रत्येत धर्माचे, जातीचे लोक एकत्र येत रामलीला सेलिब्रेशनमध्ये सहभाग घेतात. तसंच दिल्लीतील चांदनी चौक आणि इतर भागात मुस्लिमांकडून रामलीला खेळासाठी स्टेज उभारला जातो. तसंच तेथे शिख, ख्रिश्चन आणि इतर धर्माचे नागरिक रामलीला सणात सहभाग घेतात.
तामिळनाडूत पारंपरिकपद्धतीने साजरी होते नवरात्रीतामिळनाडुमध्ये नवरात्री उत्सव हा इतर राज्यांपेक्षा जरा वेगळ्या आणि हटके पद्धतीने साजरा केला जातो. कर्नाटकातील काही भाग व आंध्र प्रदेशात या उत्सवास बोम्मई कोलू असेही म्हणतात. तिथे हा रंगीबेरंगी बाहुल्यांचा उत्सव म्हणून ओळखला जातो. देवी देवतांच्या प्रतीकांबरोबरच प्राणी, पक्षी,शेतकरी यांच्याही बाहुल्या असतात. तामिळनाडुत नवरात्री उत्सव पारंपरिकपद्धतीने साजरा होतो तसंच तेथे या सणासाठी महिला पुढाकार घेतात. महिलांच्या नेतृत्वाखाली नवरात्री साजरी होते. राज्यातील प्रत्येक देवीच्या मंदिरातील देवीची मुर्ती नऊ विविध अलंकारांनी सजविली जाते. तसंच राज्यातील प्रत्येक घरी महिला बाहुल्या आणि खेळणी सुंदर पद्धतीने रचून ठेवतात. त्याला गोलू फेस्टिव्हल असं म्हंटलं जातं. नवरात्रीमध्ये तामिळनाडुतील विवाहित महिला एकमेकींच्या घरी हा गोलू फेस्टिव्हल पाहण्यासाठी जातात. तसंच तेथे नाच-गाण्याचे सांस्कृतिक कार्यक्रमही पार पडतात. मिठाई दिली जाते. या महिला एकमेकींना बांगड्या, फुलं, दागिने भेट म्हणून देतात.
गुजरामधील कलरफूल नवरात्री गुजरातमध्ये नवरात्री आणि गरबा हे समिकरणच आहे. गुजरातमध्ये प्रत्येक ठिकाणी जोरदार गाणी लावून, रंगीबेरंगी कपडे परिधान करून, शानदार रोषणाईमध्ये गरबा खेळला जातो. गुजरातमध्ये नवरात्रीचे नऊ दिवस तेथिल लोकांना अजिबात थकवा जाणवत नाही. गुजरातमधील लोक नऊ दिवस कडक उपवास करतात. त्यातून त्यांची देवीसाठीची भक्ती दिसून येते असं बोललं जातं. गुजरातमधील भाविक तेथिल आशापुरा माता, अंबाजी मंदिर, चामुंडा माता मंदिरात आवर्जुन जातात.
म्हैसूरमधील भव्य नदहब्बाम्हैसूरचा दसरा हा कर्नाटकातील शासकीय सण आहे. या सणाला कन्नडमध्ये नदहब्बा म्हणतात. एका आख्यायिकेनुसार या दिवशी चामुंडेश्वरी देवीने दैत्य महिषासुर दैत्याचा वध केला. अशा प्रकारे सुष्टांनी दुष्टांवर विजय मिळवला आणि म्हणूनच या दिवसाला ‘विजयादशमी’ म्हणतात. महिषासुराच्या नावावरूनच या प्रदेशाला म्हैसूर नाव मिळाले असे लोक मानतात. म्हैसूरचा दसरा १५ व्या शतकात विजयनगरच्या राजांनी श्रीरंगपट्टण येथे सुरू केला. वडियार राजघराण्यातील पहिला राजा वडियार यांनी ही परंपरा पुढे सुरूच ठेवली. दहा दिवस चालणाऱ्या या उत्सवाच्या पहिल्या दिवशी वडियार राजघराण्यातील दांपत्य म्हैसूरमधील चामुंडी पर्वतावरील चामुंडी मंदिरात श्री चामुंडेश्वरी देवीची यथासांग पूजा करीत. १८०५ सालापासून तिसऱ्या कृष्णराज वडियार महाराजांनी म्हैसूर राजभवनावर हा दरबार भरवण्यास सुरुवात केली होती. आजही वडियार घराण्याचे वारस श्रीकांतदत्त नृसिंहराज वडियार दसऱ्याच्या दिवशी खाजगी दरबार भरवून ही प्रथा पाळतात. नवरात्रीच्या नवव्या दिवशी म्हणजे महानवमीच्या दिवशी राजघराण्यातील तलवारींची पूजा करून हत्ती, घोडे व उंटाची मोठी मिरवणूक काढली जाते.
हिमाचल प्रदेशातील मनोरंजनाने भरलेला दसराज्या दिवशी इतर राज्यांमध्ये नवरात्र संपते त्याच दिवशी हिमाचल प्रदेशमध्ये नवरात्रोत्सवास प्रारंभ होतो. याला कुलु दसरा असंही म्हणतात. सात दिवस हा उत्सव साजरा केला जातो. या दिवशी कुल्लुमध्ये रथ यात्रेचे आयोजन केलं जाते. यात्रेत शेकडो पर्यटक सहभागी होतात. लोकनृत्य आणि संगीताचे कार्यक्रम यावेळी होतात.
पंजाबमधील जगरातापंजाबमध्ये नऊ दिवस नवरात्रोत्सव साजरी केली जाते. नवदुर्गेचे प्रतिक म्हणून अष्टमीच्या दिवशी नऊ कुमारिकांना घरी बोलवून पंचपक्वानांचे जेवण दिले जाते. त्यानंतर पैसे, कपडे व भेटवस्तू देऊन त्यांची पूजा केली जाते. तसंच तेथे नवरात्रीमध्ये जगराता साजरा होता. पंजाबमधील घरांमध्ये साजरा होणाऱ्या जगराताच्या कार्यक्रमासाठी सगळेच हजर राहतात. रात्रभर जागरण करून देवीची गाणी, भजन गायली जातात. पंजाबमधील काही भागात रावणाचा पुतळा जाळला जातो.
महाराष्ट्रातील सुंदर नवरात्रीचा सणमहाराष्ट्रामध्ये ही नऊ दिवस देवीच्या उत्सवाची धूम असते. सार्वजनिक मंडळांमध्ये देवीच्या मुर्तींची पूजा केली जाते तर घरोघरी घट बसविले जातात. गुजरातप्रमाणे महाराष्ट्रातही गरबा खेळायची पद्धत आहेत. मुंबईतमध्ये गरब्याचे विविध प्रकारही इथे बघायला मिळतात. काही लोक नऊ दिवस उपवास करतात. तसंच देवीच्या मंदिरात जातात. घरोघरी देवीसाठी प्रसाद बनविला जातो. दसऱ्याच्या दिवशी शस्त्रांची पूजा केली जाते. तसंच एकमेकांना आपट्याचं पान देऊन शुभेच्छा दिल्या जातात.
तेलंगणामध्ये साजरा होतो बाथुकम्मातेलंगणामध्ये नवरात्री सण बाथुकम्मा नावाने ओळखला जातो. नवरात्रीमध्ये बाथुकम्मा साजरा केला जातो. बाथुकम्मा हा तेथे फुलांचा उत्सव असतो. ज्यामध्ये स्त्रिया सुंदर आणि अतिशय सुव्यवस्थित फुलांच्या रचना तयार करतात. देवी शक्तीचा जागर करण्यासाठी फुलांची रचना केली जाते. फुलांची ही सजावट काही जण मंदिरात ठेवतात तर काही जण त्याचं नदीत किंवा तलावात विसर्जन केलं जातं.