मुंबई, दि. 25 - लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या लालबागचा राजा गणेशोत्सव मंडळाचे यंदाचे 83 वे वर्ष आहे. मुंबईत गणेशोत्सवाला सुरुवात झाल्यानंतर अनेकांना वेध लागतात ते लालाबागच्या राजाच्या दर्शनाचे. लालबागच्या राजाची भव्य मूर्ती डोळ्यात साठवण्याची त्याच्या चरणावर डोक ठेवण्याची भक्तांची इच्छा असते. राजावर श्रद्धा असणारे त्याचे भक्त मंडपापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्या परीने शक्य ते सर्व प्रयत्न करतात.
लालबागच्या राजाला नवसाचा गणपती म्हटले जाते. कारण लालबागच्या राजाची स्थापनाच नवसातून झाली आहे. 1934 साली लालबागमधल्या स्थानिक व्यापा-यांच्या बाजारपेठेसाठी जागेचा प्रश्न निर्माण झाला होता. त्यावेळी इथले व्यापारी नवस बोलले होते. श्रीगणेशाच्या आशिर्वादाने त्यांच्या जागेचा प्रश्न मिटला आणि इथे गणेशोत्सवाची सुरुवात झाली. आज लालबागमध्येच नाही तर, देश-विदेशात लालबागच्या राजाचे लाखो भक्त असून, राजाच्या दरबारात गरीब-श्रीमंत असा कुठलाही भेद नसतो.
लोकमत हाच लालबागच्या राजाचा 83 वर्षांचा प्रवास वेब सीरीजच्या माध्यमातून तुमच्यासमोर मांडणार आहे. मूर्तिकार संतोष रत्नाकर कांबळी यांची मुलाखत, अभिनेता चैतन्य चंद्रात्रे यांना लालबागच्या राजाच्या आशीवार्दानं आलेले अनुभव तुम्हाला पाहता येतील.
लोकमत प्रस्तुत या सहाभागांच्या वेबसीरीजमध्ये लालबागच्या राजाचे आतापर्यंत कधीही न पाहिलेले दुर्मिळ फोटो, स्मृतिचिन्हे आणि कधीही न ऐकलेले किस्से, अनुभव तुम्हाला पाहता येतील. 27 ऑगस्ट ते 31 ऑगस्ट दरम्यान रोज सकाळी 9 वाजता आणि 4 सप्टेंबरला सकाळी नऊ वाजता वेब सीरीजचा एक एपिसोड प्रसारीत होईल. लोकमत. com, लोकमत फेसबुक पेज, लोकमत न्यूज You Tube चॅनलवर तुम्ही ही सीरीज पाहू शकता.