नवी मुंबई- नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे भूमिपूजन व जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्र्स्टच्या चौथ्या कंटेनर टर्मिनलचे लोकार्पण प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होत आहे. या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या भव्य मैदानावर आयोजित या शानदार सोहळ्यास राज्यपाल सी विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग, नौकानयन व जलस्त्रोत, नदी विकास आणि गंगा पुनरुज्जीवन मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय नागरी उड्डयन मंत्री पी. अशोक गजपथी राजू, राज्याचे बंदरे, वैद्यकीय शिक्षण, माहिती तंत्रज्ञान, अन्न व नागरी पुरवठा, ग्राहक संरक्षण तथा रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण आदी मान्यवर उपस्थित असणार आहेत. नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट कंपनी रु. 16 हजार कोटी इतका खर्च असलेले विमानतळ विकसित करण्यासाठी स्थापन झाली आहे. सिडको आणि राज्य शासन हे एनएमआयएएलचे भागीदार आहेत. एकूण 2268 हेक्टरवर उभारण्यात येणाऱ्या विमानतळाचे गाभा क्षेत्र 1161 हेक्टर इतके आहे. स्वातंत्र्यानंतरचे भारतातील सर्वांत मोठे ‘ग्रीनफिल्ड’ विमानतळ असा लौकिक असलेले नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रतिवर्ष 60 दशलक्ष प्रवासी संख्या हाताळू शकेल. सदर विमानतळ प्रकल्पामुळे 10 गावांतील सुमारे 3500 कुटुंबांचे, स्थानिक उद्योगांचे व बांधकामांचे स्थानांतरण करावे लागणार आहे. प्रकल्पबाधित ग्रामस्थांना ‘भूमी, अधिग्रहण, पुनर्वसन व पुन:स्थापना, पारदर्शकता आणि योग्य मोबदला कायदा-2013’ नुसार पुनर्वसन व पुन:स्थापनेचे सर्वोत्तम पॅकेज देण्यात आले आहे.चिंचपाडा (दिघोडेपाडा), कोल्ही, कोपर, वाघिवली वाडा, चिंचपाडा (तलावपाळी), चिंचपाडा (मोठा पाडा), चिंचपाडा (मधला पाडा), वरचे ओवळे, तरघर, कोंबडभुजे व गणेशपुरी या गावांचे पुनर्वसन करण्यात येणार आहे. प्रकल्पबाधितांच्या पाल्यांना रोजगारपूरक असे प्रशिक्षण दिले जाईल.
जेएनपीटी चौथे टर्मिनलएकाच वेळी तीन कंटेनर जहाजे हाताळण्याच्या सुविधेसह भारतातील एकमेव ऑन डेक डेडिकेटेड फ्रेट कॉरीडॉर पूर्ततेची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. सात हजार 915 कोटी रुपयांची गुंतवणूक, डबल स्टेकिंगसह दीड किमी लांबीची 360 टीईयू कंटेनर ट्रेन्स हाताळण्याची क्षमता, मोठ्या कंटेनर व्हेसल्स हाताळण्यासाठी 22 रुंद आऊटरिच मोठ्या क्रेन्स सागरमाला अंतर्गत महाराष्ट्रातील बंदरांवर आधारित औद्योगिकीकरणाला मोठी चालना मिळेल.2022 पर्यंत तीन टप्पे पूर्ण होणार. चौथ्या कंटेनर टर्मिनल कार्यान्वित झाल्यानंतर वर्षाला 24 लाख कंटेनर हाताळण्याची क्षमता निर्माण होणार. टप्पा 1 व टप्पा 2 च्या पुर्ततेनंतर वर्षाला 100 लाख कंटेनर हाताळण्याची क्षमता निर्माण करण्याचे नियोजन. सागरमाला प्रकल्पाअंतर्गत महाराष्ट्रात 2.5 लक्ष कोटी रुपयांहून अधिक रकमेचे 101 प्रकल्प करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यातील 5 प्रकल्प पूर्ण झाले असून 58 प्रकल्प प्रगतीपथावर आहेत.