नवी मुंबई : कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येच्या तपासाची सूत्रे कोल्हापूर पोलिसांसह नवी मुंबई गुन्हे शाखा पोलिसांनी हाती घेतली आहेत. त्यानुसार एक महिन्यापासून गुन्हे शाखेचे एक पथक कोल्हापुरात तळ ठोकून आहे.पानसरे यांच्या हत्येला दोन महिने उलटले आहेत. मात्र अद्यापही कोल्हापूर पोलिसांचा तपास मारेकऱ्यांपर्यंत पोचलेला नाही. तपासात होणाऱ्या विलंबाचे पडसाद उमटत असून, मारेकऱ्यांना अटक व्हावी याकरिता मोर्चेही निघत आहेत. त्यामुळे गुन्ह्याचा तपास शीघ्र गतीने व्हावा याकरिता कोल्हापूर पोलिसांच्या मदतीला नवी मुंबई गुन्हे शाखेच्या पोलिसांनी धाव घेतली आहे. त्यानुसार उपआयुक्त सुरेश मेंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचे एक पथक गेले १५ दिवस कोल्हापुरात तळ ठोकून आहे. त्यामध्ये ३ अधिकारी व १५ कर्मचारी असल्याचे सूत्रांकडून समजते. हे पथक पानसरे यांच्या टोलविरोधी आंदोलनांसह सर्वच आंदोलनांचा बारकाईने तपास करीत आहे. या पथकाने कर्नाटक, बेळगाव व गोवा येथील सराईत गुन्हेगारांचीही झाडाझडती घेतली आहे. पानसरे यांच्यावर हल्ला होण्यास कारणीभूत असतील अशा सर्वच बाबींचा बारकाईने अभ्यास त्यांच्याकडून सुरू आहे. दोन वर्षांपूर्वी नरेंद्र दाभोलकर यांच्यावर झालेला हल्ला आणि पानसरे यांच्यावरील हल्ल्यात साम्य जाणवत आहे. त्यामुळे तपासाअंती दोनही घटनांची उकल होण्याचीदेखील शक्यता आहे. त्याकरिता शक्य ते पर्याय वापरून नवी मुंबई गुन्हे शाखेचे पथक आरोपीचा शोध घेण्याच्या कामात गुंतले असून, तपासाबाबत गुप्तता बाळगली जात आहे.नवी मुंबई गुन्हे शाखेने शहरातील अनेक गंभीर गुन्ह्यांची उकल केलेली आहे. (प्रतिनिधी)
हत्याप्रकरणात नवी मुंबई गुन्हे शाखेची मदत
By admin | Published: April 10, 2015 4:20 AM