नवी मुंबई : महापौर सुधाकर सोनावणे यांच्यासह शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. आयुक्त तुकाराम मुंढे यांचे पाच महिन्यांतील काम, लोकप्रतिनिधींचा होणारा अवमान व अविश्वास ठरावामागील कारणे याविषयी तब्बल ४५ मिनिटे चर्चा करण्यात आली. मुख्यमंत्री योग्य निर्णय घेतील, असा विश्वास महापौरांनी व्यक्त केला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याविरोधातील अविश्वास ठरावासाठी दिलेल्या पाठिंब्यामुळे त्यांचे आभार मानल्यानंतर महापौरांच्या नेतृत्वाखाली तीनही प्रमुख पक्षांच्या प्रमुखांनी वर्षा बंगल्यावर जाऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. ४५ मिनिटे झालेल्या चर्चेमध्ये शहरातील वास्तव स्थितीविषयी माहिती मुख्यमंत्र्यांना देण्यात आली. लोकप्रतिनिधी, नागरिक व अधिकारी, कर्मचाऱ्यांना विश्वासात घेण्यात आयुक्तांना आलेले अपयश, पाच महिन्यांतील कारवाई व त्यामुळे नागरिकांमध्ये निर्माण झालेला असंतोष याविषयी माहिती देण्यात आली. आयुक्तांविषयी सकारात्मक चर्चा झाल्याची प्रतिक्रिया महापौर सुधाकर सोनावणे यांनी दिली आहे. मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी गेलेल्या शिष्टमंडळामध्ये महापौरांसोबत उपमहापौर अविनाश लाड, सभागृह नेते जयवंत सुतार, नामदेव भगत, शिवराम पाटील, एम. के. मढवी, दशरथ भगत, द्वारकानाथ भोईर व इतर महत्त्वाचे पदाधिकारी उपस्थित होते.मुख्यमंत्र्यांनी शिष्टमंडळाचे सर्व म्हणणे ऐकून घेतले आहे. चर्चा सकारात्मक झाली असून ते नक्कीच योग्य निर्णय घेतील, असा आम्हाला विश्वास आहे. - सुधाकर सोनावणे, महापौर, नवी मुंबई नवी मुंबईमधील पाच महिन्यांतील स्थिती, आयुक्तांचा लोकप्रतिनिधींशी नसलेला संवाद व अविश्वास ठरावाविषयी वास्तव माहिती मुख्यमंत्र्यांना दिली असून चर्चा सकारात्मक झाली आहे. - नामदेव भगत, ज्येष्ठ नगरसेवक, शिवसेना
नवी मुंबईच्या महापौरांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट
By admin | Published: October 29, 2016 4:44 AM