नवी मुंबई : नवी मुंबई मेट्रोचा विस्तार कल्याण व उल्हासनगर्पयत करण्याची योजना सिडकोने आखली आहे. एमएमआरडीए आणि राज्य शासनाच्या सहभागातून भागीदारी तत्त्वावर मेट्रो मार्गाचा विस्तार करण्याची योजना असून त्यासंबंधीचा कार्यअहवाल तयार करण्याचे काम सुरू असल्याची माहिती
सिडको अध्यक्ष प्रमोद हिंदूराव यांनी दिली.
सिडकोच्या माध्यमातून बेलापूर ते तळोजा(पेंधर)दरम्यान या अकरा कि.मी. लांबीच्या मेट्रो मार्गाचे काम मागील तीन वर्षापासून सुरू आहे. या प्रकल्पासाठी तब्बल साडेचार हजार कोटी रुपये खर्च होणार आहे. प्रस्तावित नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या दृष्टीने हा मेट्रो प्रकल्प अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. असे असले तरी विमानतळाच्या पाश्र्वभूमीवर शहरातील दळणवळण यंत्रणा अत्यंत सक्षम करण्याचा निर्णय सिडकोने घेतला आहे.
त्याचाच एक भाग म्हणून नवी मुंबई मेट्रोचा विस्तार कल्याण आणि उल्हासनगर्पयत करण्याची सिडकोची योजना आहे. त्यासाठी एमएमआरडीए आणि राज्य शासनाची मदत घेण्यात येणार असून सदर प्रकल्प भागीदारीतून उभारण्यात येणार आहे. त्यादृष्टीने प्राथमिक कार्यवाही सुरू करण्यात आल्याचे हिंदूराव यांनी सांगितले.
त्याचप्रमाणो शहरात जलवाहतुकीचाही पर्याय उपलब्ध करण्यात येणार आहे. त्यासाठी 550 कोटी रूपये खर्चाचा प्रस्ताव तयार करण्यात आला असून या कामाच्या निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
(प्रतिनिधी)