पुणे : रडतखडत चालणाऱ्या ‘पीएमपी’ला दिशा देण्यासाठी ‘नवी मुंबई’ पॅटर्नचा आधार घेतला जाण्याची शक्यता आहे. पीएमपीचे अध्यक्ष तुकाराम मुंढे यांच्या आदेशानुसार ‘पीएमपी’तील काही अधिकारी मंगळवारी तेथील सार्वजनिक बससेवेची पाहणी करण्यासाठी जाणार आहेत.नवी मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदी असताना मुंढे यांनी तेथील सार्वजनिक बससेवा (एनएमएमटी) सक्षम आणि प्रवासीकेंद्री केली आहे. ‘एनएमएमटी’मध्ये ई-गव्हर्नन्ससह प्रवाशांच्या सोयीसाठी माहिती तंत्रज्ञानाचा पुरेपूर वापर करण्यात आला आहे. पूर्वी तेथील बससेवेची स्थितीही फारशी चांगली नव्हती. मुंढे यांनी महत्त्वपूर्ण निर्णय घेऊन त्यात बरीच सुधारणा केली आहे. या पार्श्वभूमीवर, मुंढे यांनी ‘पीएमपी’तील पाच-सहा वरिष्ठ अधिकाऱ्यांना तेथील बससेवेची पाहणी करण्यासाठी पाठविण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत मुंढे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी या वृत्ताला दुजोरा दिला. डॉ. श्रीकर परदेशी यांच्याकडे अतिरिक्त पदभार असताना त्यांनीही ‘पीएमपी’तील कर्मचाऱ्यांना बेस्ट आणि बंगळुरू येथील वाहतूक व्यवस्थेची पाहणी करण्यासाठी पाठविले होते. मात्र, त्यांची लगेच बदली झाल्याने या अभ्यास दौऱ्याचा पुढे फारसा फायदा झाला नाही.>‘एनएमएमटी’चे वर्कशॉप, ‘एनएमएमटी’चे वर्कशॉप, देखभाल-दुरुस्तीची कामे, एसी बस, भांडार व्यवस्था, ई-गव्हर्नन्स तसेच इतर सोयीसुविधा तसेच त्या ठिकाणी एक आदर्श आगार तयार करण्यात आले आहे. तसेच सर्व आगार, तेथील भांडार संगणकीकरणाद्वारे एकमेकांशी जोडण्यात आले आहेत. नियंत्रण कक्षही अत्याधुनिक करण्यात आलेला आहे. या सर्व कामांची पाहणी अधिकारी करणार आहेत. तेथील चांगल्या बाबी ‘पीएमपी’ राबविण्याच्या दृष्टीने मुंढे प्रयत्नशील असल्याचे समजते.>अधिकारी-कर्मचाऱ्यांची झाडाझडतीस्वारगेट आगारात सोमवारी सकाळी ९ वाजताच येऊन तुकाराम मुंढे यांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांना कामातील बेशिस्तीबद्दल चांगलेच धारेवर धरले. आगारातील प्रत्येक गोष्टीची नोंद घेऊन त्यांनी आगारप्रमुख व अभियंत्याला कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे आदेश दिले. आगारातील प्रत्येक विभागाला भेट देऊन त्यांनी तेथील असुविधा, बेशिस्तपणा, अस्ताव्यस्त पडलेले साहित्य, अस्वच्छता याबाबत नाराजी व्यक्त केली. गणवेश नसलेल्या तसेच कामात हलगर्जीपणा करणाऱ्यांनाही त्यांनी धारेवर धरले. पद कोणते, काम कोणते केले, किती वेळ, अशा विविध प्रश्नांची सरबत्ती कर्मचाऱ्यांवर केली. यामुळे तेथील कर्मचारी व अधिकाऱ्यांमधेही या भेटीची चर्चा चांगलीच रंगली आहे.
‘पीएमपी’त नवी मुंबई पॅटर्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 04, 2017 1:15 AM