मुंबई : देशातील २१ विमानतळांना ग्रीनफिल्ड विमानतळाचा दर्जा देण्यास नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने तत्वतः मान्यता दिली आहे. यात महाराष्ट्रातील नवी मुंबई, सिंधुदुर्ग आणि शिर्डी विमानतळांचा समावेश आहे. या २१ विमानतळांपैकी काहींची उभारणी सुरू आहे, तर काही प्रवासी सेवेसाठी खुली केली आहेत.महाराष्ट्रातील तीन विमानतळांसह गोव्यातील मोपा, कर्नाटकातील विजापूर, हसन, कलबुर्गी आणि शिमोगा, मध्यप्रदेशातील डबरा (ग्वाल्हेर), उत्तर प्रदेशातील कुशीनगर आणि जेवार (नोएडा), गुजरातमधील ढोलेरा आणि हिरासर, पुद्दुचेरीतील कराईकल, आंध्रप्रदेशातील दगदार्थी, भोगापुरम आणि ओरवाकल (कुर्नूल), पश्चिम बंगालमधील दुर्गापूर, सिक्कीममधील पाकयोंग, केरळमधील कन्नूर आणि अरुणाचल प्रदेशातील होलोंगी (इटानगर) आदी विमानतळांचा या यादीत समावेश आहे. यापैकी पश्चिम बंगालमधील दुर्गापूर, महाराष्ट्रातील शिर्डी आणि सिंधुदुर्ग, केरळमधील कन्नूर, सिक्कीममधील पाकयोंग, कर्नाटकातील कलबुर्गी, आंध्रप्रदेशमधील ओरवाकल (कुर्नूल) आणि उत्तर प्रदेशातील कुशीनगर विमानतळ कार्यान्वित आहेत.तर ग्रीनफिल्ड विमानतळांचा दर्जा मिळालेल्या नवी मुंबई विमानतळाची रचना कमळाच्या आकारात केली जाणार आहे. ब्रिटिश वास्तूरचनाकार कंपनी झहा हदीदने त्याची डिझाईन तयार केली आहे. या विमानतळामध्ये एकमेकांशी जोडलेले ३ टर्मिनल असतील. ग्रीनफिल्ड विमानतळ म्हणजे काय?पर्यावरणाशी संबंधित बाबींवर बारकाईने लक्ष देऊन ग्रीनफिल्ड विमानतळाचे बांधकाम केले जाते.अशाप्रकारच्या विमानतळाच्या उभारणीदरम्यान पर्यावरणाला कोणत्याही प्रकारची हानी पोहोचू नये, याची खबरदारी घेतली जाते.भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या सहकार्याने सार्वजनिक-खासगी भागीदार तत्त्वावर ग्रीनफिल्ड विमानतळांचे काम हाती घेतले जाते.दुर्गापूर येथील काझी नजरुल इस्लाम एअरपोर्ट हे देशातील पहिले ग्रीनफिल्ड विमानतळ होय.१९ सप्टेंबर २०१३ रोजी तो प्रवासी वाहतुकीस खुला करण्यात आला.
नवी मुंबई, सिंधुदुर्ग, शिर्डीला ग्रीनफिल्ड विमानतळांचा दर्जा; देशातील २१ विमानतळांचा समावेश
By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2022 8:35 AM