- जमीर काझी मुंबई : राज्यातील सागरी किनारपट्टीसह सीमा भागातील शहरांमध्ये अतिरेकी संघटनांच्या वाढत्या हालचालींच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबई व सोलापूर येथे महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाचे (एटीएस) स्वतंत्र युनिट स्थापन करण्याच्या एटीएसच्या प्रस्तावाला गृह विभागाने हिरवा कंदील दाखविला आहे. आठवडाभरात त्याबाबतची कार्यवाही होईल. दोन्ही ठिकाणी प्रत्येकी २० हून अधिक अधिकारी-कर्मचारी असतील.नवी मुंबई व सोलापुरातील स्वतंत्र कक्षामुळे स्थानिक पोलीस तसेच अनुक्रमे ठाणे व पुण्याच्या एटीएसवर पडणारा अतिरिक्त भार कमी होणार आहे. त्याचप्रमाणे या परिसरातील संशयास्पद व्यक्ती, वस्तंूबाबत तत्काळ कार्यवाही करणे शक्य होणार आहे. देशाची आर्थिक राजधानी मुंबईबरोबरच कोकण व मराठवाडा, सीमाभागात संशयास्पद व्यक्तींचा वावर, हालचाली वाढल्या आहेत. घातपाती कृत्यांची शक्यता पाहता, हा परिसर संवेदनशील बनल्याने सुरक्षेच्या दृष्टीने एटीएसला स्थानिक पोलिसांच्या मदतीने पाळत ठेवावी लागत होती. त्यामुळे दक्षिण महाराष्ट्राच्या सीमेवरील सोलापुरात एटीएसचे स्वतंत्र युनिट सुरू केल्यास आंध्र प्रदेश व कर्नाटकाच्या सीमा भागातील हालचालींवर लक्ष ठेवणे शक्य होणार आहे. त्याचप्रमाणे नवी मुंबईतील सागरी किनारा व औद्योगिक क्षेत्र तसेच उरण, रायगड या भागांवर लक्ष ठेवण्यासाठी या ठिकाणी स्वतंत्र युनिटची आवश्यकता असल्याचा प्रस्ताव एटीएसचे प्रमुख अतुलचंंद्र कुलकर्णी यांनी काही महिन्यांपूर्वी गृह विभागाला पाठविला होता. त्याला गृह विभागाने मान्यता दिली आहे. स्थानिक पोलिसांकडून हे मनुष्यबळ या कक्षासाठी वर्ग केले जातील. नवी मुंबईतील स्वतंत्र युनिटमुळे ठाणे एटीएसला मुंब्रा, कळवा, पालघर आदी भागात अधिक लक्ष केंद्रित करून तेथील घातपाती कृत्याला लगाम घालता येणार असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.कार्यालयांची संख्या आठमुख्यालयाशिवाय महाराष्ट्र एटीएसची सध्या मुंबई, पुणे, औरंगाबाद, ठाणे, नागपूर, अकोला या ठिकाणी कार्यालये आहेत. आता नवी मुंबई व सोलापूरमुळे कार्यालयांची संख्या आठवर गेली आहे. मुंबई, औरंगाबाद व पुणे शाखेचे कामकाज उपायुक्त दर्जाच्या अधिकाºयाच्या नेतृत्वाखाली तर अन्य ठिकाणी उपअधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखाली काम चालते.
नवी मुंबई, सोलापुरात एटीएसचे स्वतंत्र युनिट, गृह विभागाचा निर्णय, दहशतवादी कारवायांना लगाम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2017 5:00 AM