लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मुदत संपलेल्या महापालिका, नगरपालिकांच्या निवडणुका वाढत्या कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर पुन्हा लांबणीवर पडल्या असून तेथील प्रशासकांना मुदतवाढ देणाऱ्या विधेयकाच्या मसुद्यास रविवारी मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली.
यामुळे मुंबई महानगर क्षेत्रातील बहुचर्चित नवी मुंबई, वसई-विरार महानगरपालिका, अंबरनाथ- बदलापूर नगरपालिका आणि मुरबाड, शहापूर नगर पंचायतींची निवडणूक पुढे गेली आहे. कल्याण-डोंबिवली महापालिकेची निवडणूक जरी ऑक्टोबरमध्ये अपेक्षित असली, तरी गावे वगळण्याचा वाद सुरू असल्याने जोवर तो तिढा सुटत नाही, तोवर तेथील निवडणुका न घेण्याबाबत आयोगाने कठोर भूमिका घेतली आहे.
मसुद्यास मान्यताnनिवडणुका न झालेल्या नागरी स्थानिक संस्थांत नियुक्त प्रशासकांना आणखी मुदतवाढ देण्यात येणार असून, त्यात महापालिका, नगरपालिकांचाही समावेश असेल. त्यासाठी विधिमंडळाच्या आगामी अधिवेशनात विधेयक सादर करण्यात येणार असून, त्याच्या मसुद्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. nमुदत संपलेल्या व निवडणूक न झालेल्या नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ३० एप्रिल २०२१पर्यंत प्रशासकांची नियुक्ती केली होती. परंतु कोरोनाचा प्रादुर्भाव अजूनही कायम आहे. त्यामुळे प्रशासकांच्या या कार्यकाळात निवडणुका घेणे शक्य होणार नसल्याचे राज्य निवडणूक आयोगाने कळविले आहे. तसेच प्रशासकांना मुदतवाढ देण्याची विनंती केली आहे. त्यामुळे आता प्रशासकांना मुदतवाढ दिली जाईल.