- कमलाकर कांबळे, नवी मुबंईदुष्काळामुळे तहानेने व्याकूळ झालेल्या मराठवाड्यातील रहिवाशांची व मुक्या प्राण्यांची तहान भागविण्याचा एक छोटेखानी प्रयत्न नवी मुंबईत वास्तव्याला असलेल्या मराठवाड्यातील रहिवाशांनी केला आहे. मराठवाडा मित्र परिवार या संस्थेने लातूर जिल्ह्यातील एक गाव आणि बीड जिल्ह्यातील मयूर अभयारण्यातील प्राण्यांना स्वखर्चातून पाणीपुरवठा सुरू केला आहे.नोकरी-व्यवसायानिमित्त नवी मुंबईत स्थायिक झालेल्या मराठवाडावासीयांनी चार वर्षांपूर्वी या संस्थेची स्थापना केली. संस्थेच्या माध्यमातून विविध विधायक उपक्रम राबविले जातात. भीषण दुष्काळामुळे निर्माण झालेल्या भयावह परिस्थितीत मराठवाड्यातील आपल्या बांधवांना जमेल तेवढी मदत करण्याचे संस्थेने ठरविले. संस्थेचे डॉ. व्यंकट आलाट, प्रा. ज्ञानोबा घार, प्रवीण मुक्कावार, अभिजित मळगे, सुरेश गुडपे, गोविंद बिरादार व विनोद चेडे आदींनी या कामासाठी आग्रही भूमिका घेतली. या विधायक कामासाठी लोकांकडून निधी संकलित करण्याऐवजी संस्थेकडे जमा असलेल्या निधीचा विनियोग करण्याचे ठरले. त्यानुसार जमा असलेल्या रकमेतून नाम संस्थेला ५१ हजारांचा दुष्काळ निधी देण्यात आला. त्यानंतर उर्वरित रकमेतून लातूर जिल्ह्यातील चांडेश्वेवर या गावाला १ एप्रिलपासून पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. लवकरच आणखी दोन गावांना पाणीपुरवठा करण्यात येणार असल्याचे संस्थेचे अध्यक्ष मनोज सोमवंशी यांनी सांगितले. दुष्काळाची सर्वाधिक झळ लातूर जिल्ह्याला बसली आहे. येथील लोकांना घोटभर पाण्याच्या शोधात मैलाची पायपीट करावी लागत आहे. मुक्या प्राण्यांचे हाल सुरू आहेत. चारा व पाण्याअभावी अनेक प्राण्यांनी माना टाकल्या आहेत. या भीषण परिस्थितीचा सामना करणाऱ्या लातूरकरांच्या मदतीला अनेक सामाजिक संस्था धावून आल्या. मयूर अभयारण्यातील प्राण्यांनाही दिलासाबीड जिल्ह्यातील नायगाव येथे ३००० हेक्टरवर मयूर अभयारण्यात मोर, कोल्हे, लांडगा, रानमांजर, हरीण, काळवीट आदी वन्यप्राण्यांचे वास्तव्य आहे. परंतु दुष्काळामुळे पाण्याअभावी या प्राण्यांचेही हाल सुरू आहेत. मराठवाडा मित्र परिवार या संस्थेने नायगावचे प्राणी मित्र सिध्दार्थ सोनवणे यांच्या सहकार्याने कोरड पडलेल्या मयूर अभयारण्यातील पाणवठ्यांना संस्थेने पाणी उपलब्ध करून दिले आहे.
दुष्काळग्रस्तांच्या मदतीला धावले नवी मुंबईकर
By admin | Published: April 18, 2016 1:37 AM