मुंबई: राजद्रोहाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर तुरुंगात वाईट वागणूक मिळाल्याचा आरोप राणा दाम्पत्याने केला होता. पण, त्यानंतर राणा दाम्पत्याचा पोलीस स्टेशनमधील चहा पितानाचा एक व्हिडिओ समोर आला. त्यावरुन अजित पवारांनी राणांवर टीका केली होती. त्या टीकेला आता आमदार रवी राणा यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
'आम्हाला चहा पाजला पण...'सोमवार(9 मे) मुंबईत पत्रकारांशी बोलताना रवी राणी म्हणाले की, "अजित पवार म्हणाले होते की, आम्ही खार पोलीस स्टेशनमध्ये चहा प्यायलो. हो, जरूर चहा प्यायलो. आम्हाला जेव्हा अटक केली तेव्हा त्यांनी आमचे वकील आणि आम्हाला चहा पाजला. मात्र, त्यांनी एका महिला खासदाराला तुरुंगात कशाप्रकारची वागणूक दिली याचीही माहिती उपमुख्यमंत्र्यांनी घ्यावी. तुम्हाला जामीन देतो असे सांगून साडेबारानंतर आम्हाला सांतक्रुजच्या तुरुंगात नेण्यात आले. त्याची माध्यमांना माहिती दिली नाही," असं रवी राणा म्हणाले.
'पाणी-सतरंजी दिली नाही'त्यांनी पुढे सांगितलं की, "सांताक्रुजच्या लॉक अपमध्ये तुम्हाला बसवू आणि सकाळी न्यायालयात नेऊ असं सांगून आम्हाला रात्रभर तुरुंगात ठेवलं. त्या रात्री साडेबारानंतर खासदार नवनीत राणा यांना त्रास देण्यात आला. मी विधीमंडळाचा आमदार असतानाही त्रास दिला. पहाटे 5 वाजेपर्यंत आम्हाला पाणी आणि सतरंजीदेखील दिली नाही. त्या परिस्थिती माहिती अजित पवारांनी घ्यावी. एका महिला खासदाराला पोलीस विभागाचा दुरुपयोग करून अत्यंत वाईट वागणूक दिली. याची माहिती आणि तक्रार दिल्लीला देणार आहे," असंही रवी राणा म्हणाले.
बीएमसीचे पथक राणांच्या घरीते पुढे म्हणाले की, "आज मुख्यमंत्र्यांनी बीएमसीचे पथक आमच्याकडे पाठवले आहे. मी चार दिवसांपासून त्याची वाट पाहत होतो. माझा एकच फ्लॅट मुंबईला आहे, त्याची जी चौकशी करायची ती करा. मुख्यमंत्र्यांनी देखील त्याची ऑनलाईन पाहणी करावी. त्यांना काही अडचण असेल तर अनिल परब आणि संजय राऊत या तुमच्या उजवा आणि डावा हात असलेल्या लोकांना फ्लॅटचं मोजमाप करायला पाठवा,'' असंही राणा म्हणाले.