नवनीत कौर-राणाही लोकसभेच्या रिंगणात उतरण्याची शक्यता
By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2019 03:23 PM2019-03-23T15:23:40+5:302019-03-23T15:25:56+5:30
स्वाभिमानी शेतकरी संघटनेला राष्ट्रवादीकडून आधीच एक जागा सोडण्यात आली आहे.
मुंबई : भाजप आणि शिवसेना युती झाली असली तरीही रिपब्लिकन आणि अन्य मित्रपक्षांना एकही जागा सोडत नसताना काँग्रेस-राष्ट्रवादीने त्यांच्या वाट्याल्या आलेल्य़ा जागांपैकी प्रत्येकी 2 जागा मित्रपक्षांसाठी सोडण्याची तयारी दाखविली आहे. यामुळे अपक्ष आमदार रवी राणा यांच्यासाठी एक जागा सोडण्यात येणार आहे. अमरावती लोकसभा मतदारसंघातून राणा यांच्या पत्नी आणि अभिनेत्री नवनीत कौर राणा या लढण्याची शक्यता आहे.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेला राष्ट्रवादीकडून आधीच एक जागा सोडण्यात आली आहे. हातकणंगले मतदारसंघातून स्वाभिमानीचे अध्यक्ष राजू शेट्टी यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर सांगलीची जागाही स्वाभिमानीला सोडण्याचा विचार झाला असून ही जागा काँग्रेसच्या कोट्यातून देण्यात येणार आहे.
काही दिवसांपूर्वीच औरंगाबाद आणि अहमदनगर या दोन जागांची अदलाबदली करण्यास आपण तयार आहोत असेही काँग्रेसने कळवले होते. मात्र तो निर्णय अंमलात आला नाही. तेव्हा राष्ट्रवादीने अमरावती व औरंगाबादची अदलाबदल करुन मागितली. मात्र त्यावर मंगळवारी रात्रीपर्यंत काँग्रेसकडून कोणतेही उत्तर आले नव्हते. त्याच काळात नवनीत कौर राणा शरद पवारांना भेटल्या. तेव्हा आम्ही तुम्हाला पाठींबा देऊ, मात्र दोन दिवस वाट पहावी लागेल, काँग्रेसचा निरोप काय येतो ते पाहू, असे त्यांना आज सांगण्यात आले आहे. मात्र, राणा पतीपत्नी आणि शरद पवार यांच्या बैठकीचा सूर ओळखून नवनीत राणा यांनी आपल्याला पवारांनी पाठींबा देऊ केला, असे जाहीर करुन टाकले होते. यामुळे नवनीत कौर यांना राष्ट्रवादीच्या कोट्यातील जागा देण्यात येणार असल्याचे समजते.
तर चौथी जागा बहुजन विकास आघाडीला देणात येणार आहे.
Sources: There was 26-22 formula between Congress-NCP. Now they've given 2 seats from each one's quota to allies. 2 seats for Swabhimani Shetkari Sanghatana, 1 for Bahujan Vikas Aghadi & 1 seat is left for independent MLA Ravi Rana, his wife Navneet Kaur might contest from there pic.twitter.com/dFmxI8SGr9
— ANI (@ANI) March 23, 2019
नवनीत कोर राणा शरद पवार भेटीत काय घडले
नवनीत कौर राणा आणि त्यांचे पती रवी राणा यांनी खा. शरद पवार आणि खा. प्रफुल्ल पटेल यांची त्यांच्या घरी जाऊन भेट घेतली. नवनीत कौरसाठी उमेदवारी दिल्यास आम्ही विजय मिळवून देऊ असे त्या दोघांनीही पटवून दिले. मात्र अमरावतीची जागा कोणी लढवायची यावर अद्याप दोन्ही काँग्रेसमध्ये एकवाक्यता न झाल्यामुळे याचा निर्णय झाल्यावरच भूमिका स्पष्ट होईल असेही जयंत पाटील म्हणाले. खा. प्रफुल्ल पटेल यांच्या निवासस्थानी राष्ट्रवादीचे नेते संजय खोडके उपस्थित होते. मात्र त्यांची आणि राणा पतीपत्नींची भेट झाली नाही. यावर खोडके यांना विचारले असता ते म्हणाले, मी माझी भावना शरद पवार यांना भेटून स्पष्ट केली आहे. त्यावर मी माध्यमांमध्ये काही बोलणार नाही.