लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : हनुमान चालीसा प्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आलेल्या अमरावतीच्या अपक्ष खासदार नवनीत राणा व त्यांचे पती आमदार रवी राणा यांना ९ जूनपर्यंत अटक करणार नसल्याचे आश्वासन मुंबई पोलिसांनी विशेष न्यायालयाला दिले. राणा दाम्पत्याचा जामीन रद्द करण्यासाठी राज्य सरकारने विशेष न्यायालयात अर्ज दाखल केला आहे.
बुधवारी या अर्जावर सुनावणी झाली. ५ मे रोजी विशेष न्यायालयाचे न्या. आर. एन. रोकडे यांनी राणा दाम्पत्याची जामिनावर सुटका केली. मात्र, त्यांचा जामीन मंजूर करताना न्यायालयाने काही अटी घातल्या. त्यानुसार, राणा दाम्पत्याला प्रसारमाध्यमांशी बोलण्यास मनाई करण्यात आली. तसेच या दाम्पत्याने पुन्हा तशाच स्वरुपाचा गुन्हा केला व अटींचे उल्लंघन केले तर जामीन रद्द होईल, असे म्हटले होते.राणा दाम्पत्याने अटींचे उल्लंघन केले आहे, असे म्हणत पोलिसांनी त्यांचा जामीन रद्द करण्यासाठी ९ मे रोजी न्यायालयात अर्ज केला.
बुधवारी राणा दाम्पत्याने एकत्रितपणे पोलिसांच्या अर्जावर उत्तर दाखल केले. आम्ही पोलीस तपासात हस्तक्षेप केला नाही किंवा सदर प्रकरणासंबंधी माध्यमांमध्ये काही वक्तव्य केले नाही. जामीन रद्द करण्यासाठी पोलीस कोणतेही ठोस कारण देऊ शकलेले नाहीत, असे राणा दाम्पत्याने उत्तरात म्हटले आहे. न्यायालयाने ९ जून रोजी या अर्जावर पुढील सुनावणी ठेवली.