मुंबई: राजद्रोहाच्या आरोपाखाली तुरुंगात असलेल्या नवनीत (Navneet Rana) आणि रवी राणा (Ravi Rana) यांच्या जामीन अर्जावर आज मुंबई सत्र न्यायालयात सुनावणी होणार होती. पण, आजची सुनावणी टाळण्यात आली असून, यावर उद्या(शनिवार) निर्णय होणार आहे.
मुंबई सत्र न्यायालयाने आजची सुनावणी टाळण्यामागचे कारणही दिले आहे. व्सस्त कामकाजामुळे न्यायालयाने आजची सुनावणी टाळली आहे. आज याचिकाकर्त्या राणा दाम्पत्याच्या वकिलांनी न्यायालयाला विनंती केली होती की, याचिकाकर्ते दाम्पत्य निवडून आलेले आमदार आणि खासदार आहेत. प्रतिष्ठित लोकप्रतिनिधी असल्यामुळे त्यांच्यावर अन्याय होऊ नये यासाठी आज सुनावणी घेण्यात यावी.
पण, न्यायालयाच्या आजच्या वेळापत्रकानुसार, इतर अनेक महत्त्वाची प्रकरणे असल्यामुळे राणा दाम्पत्यांची सुनावणी घेण्यास कोर्टाने नकार दिला. न्यायालयाकडे आज जराही वेळ नाही, असे न्यायाधीश राहुल रोकडे यांनी स्पष्ट केले. त्यामुळे आता राणा दाम्पत्याला जामीनासाठी अजून काहीकाळ वाट पाहावी लागणार आहे.
काय आहे प्रकरण? काही दिवसांपूर्वी अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी काही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या 'मातोश्री' निवासस्थानाबाहेर हनुमान चालिसाचे पठण करणार असल्याची घोषणा केली होती. राणांच्या घोषणेनंतर राज्यभरातून तीव्र पडसाद उमटले. शिवसैनिकांनी राणा दाम्पत्याविरोधात मातोश्रीबाहेर ठिय्या दिला. अखेर राणांनी आपली घोषणा मागे घेतली, पण त्यानंतर पोलिसांनी राणांना अटक केली. त्यांच्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला. सध्या खासदार नवनीत राणा भायखळा कारागृहात आहेत, तर आमदार रवी राणा तळोजा कारागृहात आहेत.