खासदार नवनीत राणा यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. यामुळे तुरुंगात असताना त्यांना मानेच्या, पाठीच्या दुखण्याचा त्रास सुरु झाला होता. यासाठी जामिन मिळाला त्यात दिवशी त्यांना लिलावती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. आज त्यांची एमआरआय चाचणी करण्यात आली असून मानेच्या दुखण्यावर खरे काय ते समजणार आहे.
नवनीत राणा या तुरुंगात सहा दिवसांपासून मानेच्या दुखण्याची तक्रार करत होत्या. जामिन अर्जावर सुनावणीवेळी त्यांना हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले होते. तिथे तपासणी करून त्यांना पुन्हा तुरुंगात आणण्यात आले होते. यानंतर दुसऱ्या दिवशी जामिनावर सुटल्यावर राणा यांना पुन्हा हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. तिथे त्यांची आमदार रवी राणा, भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनी भेट घेतली होती. यावेळी नवनीत राणा यांनी छातीत दुखत असल्याची, मान व शरीराचे अन्य भाग दुखत असल्याची तक्रार केली होती. यावर आज त्यांचा एमआरआय आणि फुल बॉडी चेकअप करण्यात आला आहे.
नवनीत राणा यांनी पोलिसांवर अभद्र वागणूक दिल्याचा आरोप केला होता. लोकसभा अध्यक्षांना याचे पत्रही पाठविले होते. आपल्याला पाणी देण्यात आले नाही, बाथरुमलाही जाऊ दिले नाही असा त्यांनी आरोप केला होता. मात्र, पोलिसांनी पोलीस ठाण्यात त्यांना चहा-बिस्किटांपासून पाण्याची बॉटल वगैरे दिल्याचा व्हिडीओ ट्विट करण्यात आला होता. तसेच लोकसभेला अहवालही पाठविण्यात आला आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या घरासमोर हनुमान चालिसा म्हणण्याचे आव्हान राणा दाम्पत्याने दिले होते. यामुळे त्यांना मुंबई पोलिसांनी अटक केली होती. राणांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. यानंतर त्यांनी जामिनासाठी अर्ज केला होता, अखेर दोघांनाही १२ दिवसांनी जामिन मिळाला. त्यांच्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. तो चुकीचा असल्याचे निरीक्षण उच्च न्यायालयाने नोंदविले होते.