मुंबई : कोरोनाकहरामुळे आपल्या लाडक्या दैवतांचे दर्शन दुर्लभ झालेल्या भक्तांना उद्या, गुरुवारपासून प्रत्यक्ष देवळात जाऊन देवदर्शन घेता येणार आहे. राज्य सरकारने घटस्थापनेच्या मुहूर्तावर राज्यातील सर्व प्रार्थनास्थळे खुली करण्याचा निर्णय घेतल्याच्या पार्श्वभूमीवर सर्व धार्मिक स्थळे भक्तांच्या स्वागतासाठी सज्ज झाली आहेत. त्याचबरोबर कोरोनाविघ्न पुन्हा उद्भवू नये यासाठी विविध मंदिर प्रशासनेही राज्य सरकारद्वारा जारी करण्यात आलेल्या नियमावलीचे काटेकोर पालन होईल, यासाठी सज्ज झाली आहेत.
सरकारने राज्यातील धार्मिक स्थळांसाठी केलेल्या नियमावलीनुसार ६५ वर्षांवरील नागरिक, सहव्याधी असलेले नागरिक, गर्भवती महिला आणि १० वर्षांखालील मुलांना मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही. सोशल डिस्टन्सिंग, मास्क, निर्जंतुकीकरण इत्यादी आवश्यक करण्यात आले आहे. कोणत्या प्रार्थनास्थळामध्ये किती भाविकांना प्रवेश दिला जावा, याचा निर्णय संबंधित प्रार्थनास्थळाच्या व्यवस्थापन समिती वा ट्रस्टने घ्यावयाचा आहे. भाविकांच्या गर्दी आणि प्रमाणाचे नियोजन करण्यासाठी ठरावीक अंतरावर मार्किंग्ज करून रांगा लावण्याचे सक्तीचे करण्यात आले आहे.