मुंबई, दि. 21 : केंद्राप्रमाणे सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशी लागू होण्याच्या प्रतीक्षेत असलेल्या राज्य शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना तूर्तास महागाई भत्तावाढीवर समाधान मानावे लागणार आहे. महागाई भत्तावाढ करुन राज्य सरकारने आपल्या कर्मचाऱ्यांना नवरात्रीचं गिफ्ट दिलं आहे. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 4 टक्क्यांची वाढ करण्यात आली आहे.
6 लाख निवृत्त कर्मचाऱ्यांसह 16 लाख कर्मचाऱ्यांना याचा लाभ होणार आहे. ही वाढ 1 जानेवारी 2017 पासून देण्यात येणार आहे. यापूर्वी एप्रिल महिन्यातही राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात सात टक्क्यांची वाढ करण्यात आली होती. त्यावेळी महागाई भत्ता 132 टक्क्यांपर्यंत वाढविण्यात आला होता. ऑगस्टपासूनचा वाढीव महागाई भत्ता कर्मचाऱ्यांना रोख स्वरूपात दिला जाईल. तर, त्यापूर्वीच्या 7 महिन्यांमधील वाढीव महागाई भत्ता कर्मचाऱ्यांना कशाप्रकारे द्यायचा, याबाबत स्वतंत्र आदेश काढण्यात येणार आहे.
केंद्रानं 12 तारखेला कर्मचारी व सेवानिवृत्त वेतनाधारकांच्या महागाई भत्त्यामध्ये 1 टक्क्यानं वाढ केली होती, त्यामुळे कर्मचा-यांना मिळणारा महागाई भत्ता 4 टक्क्यांवरून 5 टक्क्यांवर जाणार आहे. 1 जुलैपासून हा नवा नियम लागू होणार आहे. केंद्राच्या या निर्णयाचा 50 लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांना आणि 61 लाख सेवानिवृत्त वेतनधारकांना फायदा पोहोचणार असून, कर्मचा-यांची दिवाळी धूमधडाक्यात साजरी होणार आहे. केंद्रानं महागाई भत्ता एका टक्क्यानं वाढवल्यामुळे आता कर्मचा-यांना मूळ वेतन 5 टक्क्यांनी वाढून मिळणार आहे. चालू आर्थिक वर्षाच्या (8 महिन्यांच्या) जुलै 2017 ते फेब्रुवारी 2018 या कालावधीसाठी कर्मचाऱ्यांना हा महागाई भत्ता मिळणार आहे. तसेच निवृत्त कर्मचाऱ्यांनासुद्धा याची भरपाई देण्यात येणार असून, सरकारी तिजोरीवर 3,068.26 व 2,045.50 कोटी रुपयांचा भार पडणार आहे.