- लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : भारतीय नौदलाची गस्ती नौका आयएनएस शारदाच्या तत्पर हालचालींमुळेच एडेनच्या आखातात मालवाहतुकीचे अपहरण करण्याचा सोमालीयन समुद्री चाच्यांचा डाव उधळला गेला. मंगळवारी, एडेनच्या आखातातून प्रवास करणाऱ्या लॉर्ड माउंटबॅटन या व्यापारी जहाजाने धोक्याचा इशारा पाठविला होता. ओमन येथील सलल्लाह बंदरापासून २३० समुद्री मैलावर लॉर्ड माउंटबॅटन जहाजाने समुद्री चाच्यांनी अपहरणाच्या उद्देशाने पाठलाग सुरू केल्याचा इशारा दिला. दोन संशयास्पद छोट्या जहाज बोटी मालवाहतुकीचा पाठलाग करत असल्याचा निरोप मिळाल्यानंतर मालवाहू जहाजापासून ३० समुद्री मैलांवर असणाऱ्या आयएनएस शारदा या गस्तीनौकेने तत्परतेने घटनास्थळी धाव घेतली. भारतीय नौदलाचे जहाज घटनास्थळी दाखल होताच समुद्री चाच्यांनी पळ काढला. भारतीय नौदलाच्या जवानांनी घटनास्थळावरून एक रिकामे जहाज हस्तगत गेले. या जहाजात मासेमारीसाठी आवश्यक जाळे अथवा यंत्रणा नव्हती.