राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांना ईडीने अटक करून न्यायालयात हजर केले. इथे ईडीने मलिक यांच्यावर दाऊदशी संबंध असल्याचे म्हणत गंभीर आरोप केले आहेत. यावर मलिक यांचे वकील अमित देसाई यांचा युक्तीवाद सुरु आहे. देसाई यांनी ईडीच्या आरोपांचा फोलपणा न्यायालयास पटवून देण्याचा प्रयत्न केला आहे.
मलिक यांनी ही संपत्ती १९९७-२००३ मध्ये विकत घेतली आहे. तेव्हा पीएमएलए कायदा अस्तित्वात नव्हता. मग आता २० वर्षांनी कारवाई करण्यामागचा उद्देश काय असा सवाल देसाई यांनी केला. याचबरोबर तेव्हा का कारवाई केली नाही, असा सवालही केला आहे. ईडीने दाऊदवर गुन्हा दाखल केला तो कोणालाही दाखविलेला नाही. दाऊद हे धंदे गेल्या ३० वर्षांपासून करतोय मग त्याच्यावर फेब्रुवारीत गुन्हा दाखल करण्याचा उद्देश काय असा सवालही त्यांनी न्यायालयात केला आहे.
हसीना पारकर यांच्याकडून जी जमिन विकत घेतल्याचा आरोप ईडी करत आहे, ती जागा ज्या सलीम पटेल नावाच्या व्यक्तीची होती, तो सलीम पटेल दुसराच आहे. हसीना पारकरचा चालक हा सलीम पटेल उर्फ सलीम फ्रूट हा होता. परंतू या नावाचे दोन व्यक्ती होते. सलीम फ्रूट हा मेला आहे. तर दुसरा सलीम जिवंत आहे. पहिल्याचा अंडरवर्ल्डशी संबंध होता, दुसऱ्याचा काहीही संबंध नाही, असेही देसाई यांनी न्यायालयाला सांगितले.
एनआयएने एका आरोपावरून गुन्हा दाखल केला होता. त्यावरून ईडीने हे प्रकरण हाती घेतले आहे. यात ईडीने काहीही तपास केलेला नाही. केवळ आरोपांच्या माहितीवरून ईडीने मलिक यांना ताब्यात घेतले आणि अटक केली आहे, असा आरोपही देसाई यांनी केला आहे. ईडीने खरा सलीम कोण हे दाखवावे असे आव्हानही देसाई यांनी दिले आहे.