मुंबई: राज्य सरकारमधील मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांना सक्तवसुली संचलनालयानं अटक केली आहे. मलिक यांना पहाटे ताब्यात घेण्यात आलं. त्यानंतर तब्बल ८ तास त्यांची चौकशी झाली. यानंतर ईडीनं त्यांना अटक केली. मलिक यांना अटक झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. मलिक यांच्यावर सूडबुद्धीनं कारवाई करण्यात आल्याचा आरोप कार्यकर्त्यांकडून होत आहे.
नवाब मलिक यांना अटक झाल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याशी संवाद साधला. कायदा सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीनं दोघांमध्ये चर्चा झाली. यानंतर मुख्यमंत्री ठाकरे, गृहमंत्री वळसे पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यामध्ये बैठक होणार आहे.
अजित पवारांच्या दालनात बैठक सुरूनवाब मलिक यांच्या अटकेनंतर राष्ट्रवादीच्या वरिष्ठ मंत्र्यांची बैठक सुरू झाली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या दालनात बैठक सुरू आहे. मंत्रालयात सुरू असलेल्या या बैठकीला दिलीप वळसे पाटील, छगन भुजबळ, राजेश टोपे उपस्थित आहेत.
मलिक राजीनामा देणार?ईडीच्या अटकेत असलेले नवाब मलिक राजीनामा देण्याची शक्यता आहे. एबीपी माझानं सुत्रांच्या हवाल्यानं याबद्दलचं वृत्त दिलं आहे. याआधी ईडीच्या कारवाईमुळे गृहमंत्री अनिल देशमुख यांना राजीनामा द्यावा लागला होता. त्यामुळे विरोधकांनी दबाव आणण्याआधीच मलिक राजीनामा देतील अशी शक्यता आहे. मलिक त्यांचा राजीनामा मुख्यमंत्री ठाकरेंकडे पाठवू शकतात.
मलिक यांनी राजीनामा द्यावा- पाटीलभाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मलिक यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. मलिक यांना ईडीनं अटक केली आहे. त्यामुळे त्यांना मंत्रिपदी राहण्याचा कोणताही कायदेशीर किंवा नैतिक अधिकार नाही. बाळासाहेब ठाकरे यांचा वारसा असलेले उद्धव ठाकरे सध्या राज्याचे मुख्यमंत्री आहेत. ते या प्रकरणी भूमिका घेतील अशी अपेक्षा आहे. मुख्यमंत्री ठाकरेंनी मलिक यांचा राजीनामा न घेतल्यास आम्हाला रस्त्यावर उतरून आंदोलन करावं लागेल, असा इशारा त्यांनी दिला.