राज्याचे मंत्री नवाब मलिक यांना ईडीने जवळपास आठ तासांच्या चौकशीनंतर अटक केल्याने राज्यातील राजकारणात मोठ्या हालचाली वाढल्या आहेत. मलिक यांना सत्र न्यायालयात हजर करण्यात आले असून मलिक यांनी न्यायालयात गंभीर आरोप केले आहेत.
Nawab Malik Arrest: नवाब मलिक यांना ईडीने नेमकी कशासाठी अटक केली? हे आहेत आरोप
ईडीच्या अधिकाऱ्यांनी मला न कळवता जबरदस्तीने इथे आणलेले आहे. मला कोणत्या अधिकारखाली अटक केली, याचीही माहिती दिलेली नाही, असा आरोप नवाब मलिक यांनी न्यायालयात केला आहे. जे.जे.रुग्णालयात वैद्यकीय चाचणी झाल्यानंतर मंत्री नवाब मलिक यांना सेशन कोर्टासमोर हजर करण्यात आले. नवाब मलिक यांच्याकडून अॅड. अमित देसाई बाजू मांडत आहेत.; ईडीकडून मनी लॉन्ड्रींग प्रकरणी कोठडीची मागणी करण्यात आली आहे.
याचबरोबर राष्ट्रवादीच्या सर्व मंत्र्यांना मुंबईत पोहोचण्याचे आदेश राष्ट्रवादीने दिले असून पक्षाचे अध्यक्ष शरद पवार देखील थोड्याच वेळात मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी जाणार आहेत. नवाब मलिक मंत्रिपदाचा राजीनामा देतील अशी शक्यता वर्तविली जात आहे. याचबरोबर सायंकाळी साडे सहा वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सर्व मंत्रिमंडळाची तातडीची बैठक बोलावली आहे. नवाब मलिकांच्या अटकेमुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी ईडी कार्यालयाबाहेर जोरदार निदर्शनं करण्यास सुरुवात केली आहे.