Nawab Malik Arrested : नवाब मालिकांच्या अटकेच्या वृत्तानंतर ईडी कार्यालयाबाहेर शेकडोंच्या संख्येने जमलेल्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक होत भाजपविरोधात घोषणाबाजी सुरू केली. त्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
कार्यकर्त्यांनी ईडी कार्यालयाबाहेर जमण्यास सुरुवात केली. मुंबई पोलिसांकडूनही मलिक यांच्या घरासह ईडी कार्यालय, जेजे रुग्णालय आणि कोर्टाबाहेर बंदोबस्त वाढवला होता. अटकेबाबत समजताच कार्यकर्त्यांनी बॅरिकेट्स तोडून आत जाण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी त्यांना अडवून पुन्हा माघारी धाडले. ‘मी साहेबांसोबत’ असे लिहिलेल्या टोप्या परिधान करत कार्यकर्त्यांची घोषणाबाजी सुरू होती.
दुसरीकडे मालिकांच्या अटकेचे वृत्त समजताच तणावात भर पडली. नवाब मलिक यांना वैद्यकीय तपासणीसाठी बाहेर आणताच, हसतच हम लढेंगे म्हणत वाहनातून बाहेर पडले. कार्यकर्त्यांकडून घोषणाबाजी वाढली. पोलीस उपायुक्त डॉ. हरी बालाजी यांनी स्वतः हजर राहून परिस्थिती नियंत्रणात आणत, कार्यकर्त्यांना समजावून माघारी पाठवण्याचा प्रयत्न केला. मलिक यांना न्यायालयात आणताच तेथे त्यांचे कुटुंबीयही हजर होते. यावेळी न्यायालयाच्या आवारात त्यांच्या मुलीला अश्रू अनावर झाले होते. सुनावणीनंतर पावणेनऊच्या सुमारास मलिक यांना कोर्टातून ईडी कार्यालयात नेण्यात आले.
आधी लढलो आताही लढणार.. नवाब मलिक यांची मुलगी सना मलिक यांनी सांगितले की, वडिलांना भेटून पुन्हा लढण्याची हिम्मत आली आहे. आम्ही आधीही लढलो आणि पुढेही लढणार आहोत. तसेच, त्यांनी आधीही सांगितले होते ते आणखीन फर्जीवाडे उघड करणार आहेत. आरोप केल्यामुळे सत्य लपून राहत नाही. आता सुरू झालेली लढाई ही राजकीय आहे. आरोप करणारे लोक पुरावे देत नाहीत. आम्हाला न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे. त्यानुसार, आम्ही आधीही लढलो आणि पुढेही लढणार असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.