मुंबई - २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर निर्माण झालेल्या राजकीय अनिश्चिततेदरम्यान, देवेंद्र फडणवीस आणि भाजपाने एकत्र येत काही तासांच्या सरकारची स्थापना केली होती. या सरकारच्या आठवणींचा उल्लेख भाजपाला अजूनही टोचतो. दरम्याना, आज सभागृहात चर्चा सुरू असताना अल्पसंख्याक नवाब मलिक यांनी रात्रीचे खेळ आम्ही करत नाही म्हणत भाजपाला चिमटा काढला. मात्र सुधीर मुनगंटीवार यांनी हा डाव अजितदादांचे नाव घेत राष्ट्रवादी काँग्रेसवरच उलटवला.
नवाब मलिक यांनी रात्रीचे उद्योग असा उल्लेख करत भाजपाला चिमटा काढल्यानंतर सुधीर मुनगंटीवार यांनी नवाब मलिक यांना त्यांच्याच शब्दात अडकवले. सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, अल्पसंख्याकमंत्री आरक्षण देत नाही. जर देता आलं असतं तर यांनी कधीच रात्रीच्या रात्री फाईल काढली असती. बाकी रात्रीचं काय म्हणालात? नवाब मलिकजी तुम्ही अजितदादांचे विरोधक आहात का, मग कशाला म्हणता की रात्रीचे उद्योग तुम्ही करत नाही. आता त्यावेळी अजितदादांकडून एकदा चूक झाली असेल. पण म्हणून त्यासंदर्भात असं वारंवार म्हणणार का. अजितदादा आमचे जवळचे मित्र आहेत, सुधीर मुनगंटीवारांच्या या पावित्रामुळे सभागृहातील वातावरण काही काळासाठी हलके फुलके झाले.
दरम्यान, आजही सभागृहामध्ये मुख्य विरोधी पक्ष असलेला भाजपा आणि सत्ताधारी महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये वारंवार शाब्दिक चकमकी होत होत्या. त्यात शिवसेना नेते अनिल परब आणि भाजपा आमदार नितेश राणे यांच्यातही जोरदार वादावादी झाली. अनिल परब बोलत असताना नितेश राणे यांनी मध्येच प्रश्न विचारल्याने या वादाला तोंड फुटले होते.