मुंबई : जम्मू-काश्मीरच्या पुलवामा येथे 14 फेब्रुवारी 2019 रोजी झालेल्या हल्ल्यामुळे संपूर्ण देश हादरला होता. या दहशतवादी हल्ल्यात 40 जवान शहीद झाले होते. शहीद झालेल्या सीआरपीएफच्या 40 जवानांच्या स्मृतीस्थानी बांधलेल्या स्मारकाचे शुक्रवारी लेथपुरा कॅम्पमध्ये उद्घाटन होणार आहे. तर पुलवामा हल्ल्याचं सत्य देशाच्या जनतेला जाणून घ्यायचं असल्याने या हल्ल्याची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि अल्पसंख्याक मंत्र नवाब मलीक यांनी केली आहे.
पुलवामा हल्ल्यात सीआरपीएफच्या 40 जवानांचा मृत्यू झाला. त्यांनतर हा मुद्दा राष्ट्रीय-अंतराष्ट्रीय बनला. पुढे निवडणुकीत सुद्धा पुलवामा हल्ला राजकीय मुद्दा बनला आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी निवडणुका जिंकले. मात्र आजपर्यंत या प्रकरणाची कोणतेही चौकशी झाली नसल्याचे मलिक म्हणाले.
या हल्ल्यात आजपर्यंत आरडीएक्स कुठुन आले आणि वाहन घटनास्थळावर कसे पोहोचले हे स्पष्ट होऊ शकले नाहीत. तसेच हे वाहन कोण चालवत होता याची चौकशी करण्यात आलेली नाही. त्यामुळे लोकांना सत्य जाणून घ्यायचे असून चौकशी केली पाहिजे अशी मागणी मलिक यांनी केली.