मुंबई – शिवसेना नेते संजय राऊत यांच्यानंतर आता राष्ट्रवादी नेते आणि मंत्री नवाब मलिकांचीही(Nawab Malik) संपत्ती ईडीकडून जप्त करण्यात आली आहे. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी मलिकांची कुर्ल्यातील गोवावाला कंपाऊडसह ७ मालमत्ता जप्त करण्याची कारवाई ईडीनं केली आहे. मलिक यांच्यावर दाऊदशी संबधित जमीन व्यवहार केल्याचा ठपका ठेवण्यात आला होता. त्याप्रकरणी ईडीने त्यांना अटक केली होती.
३ फेब्रुवारी २०२२ रोजी NIA द्वारे दाखल झालेल्या गुन्ह्यातंर्गत ही कारवाई करण्यात आली आहे. दाऊद इब्राहिमने भारत सोडल्यानंतर हसीना पारकर आणि इतर सहकाऱ्यांच्या मदतीने तो गुन्हेगारी कारवाया करत होता. त्याचवेळी टायगर मेमनसंबंधित दहशतवाद्यासोबत मलिक यांनी बेकायदेशीर जमीन व्यवहार केल्याचा आरोप झाला. याच आरोपाखाली मलिकांना अटक केली. आता ईडीने कुर्ला पश्चिम येथील गोवावाला कंपाऊंड, कुर्ला पश्चिमेतील व्यावसायिक मालमत्ता जप्त, उस्मानाबाद येथील १४८ एकर जमीन, कुर्ला पश्चिमेतील ३ फ्लॅट आणि वांद्रे येथील २ सदनिका अशा एकूण ८ मालमत्ता जप्त करण्याची कारवाई केली आहे.
नवाब मलिकांना १८ एप्रिलपर्यंत कोठडी
अलीकडेच मुंबईतील विशेष पीएमएलए कोर्टाने मलिक यांच्या न्यायालयीन कोठडीत १८ एप्रिलपर्यंत वाढ केली आहे. तर न्यायालयाच्या आदेशानुसार मलिक यांना कोठडीत बिछाना, खुर्ची उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसंच त्यांना घरचं जेवण आणि औषधं घेण्यासही न्यायालयाने परवानगी दिली आहे. ईडीने २३ फेब्रुवारीला मलिक यांच्यावर अटकेची कारवाई केली आहे. यामध्ये त्यांना २१ मार्चपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावत त्यांची रवानगी आर्थर रोड कारागृहात करण्यात आली होती. त्यानंतर मलिकांच्या कोठडीत ४ एप्रिलपर्यंत वाढ करण्यात आली होती. उच्च रक्तदाब व मधुमेह असल्याने कमी मीठ असलेले घरचे जेवण मिळावे, अशा विनंतीचाही अर्ज करण्यात आला होता. त्यावर मलिक यांचा वैद्यकीय अहवाल पाहून त्यांना औषधं आणि घरगुती जेवण घेण्यास परवानगी देण्यात आली.
काय आहे नेमकं प्रकरण?
मुंबईत आणि लगतच्या परिसरात ईडीनं काही दिवसांपूर्वी छापेमारी केली होती. ईडीच्या रडारवर डॉन दाऊद इब्राहीमची मुंबईतली मालमत्ता आणि त्या संपत्तीशी निगडीत व्यवहार करणारे काही नेतेमंडळी ईडीच्या रडारवर होते. केंद्रीय गृहमंत्रालयाच्या आदेशानंतर ईडीने ही कारवाई सुरू केली. या छापेमारीनंतर काही नेते अडचणीत येऊ शकतात याची दबक्या आवाजात चर्चा सुरु होती. त्यावेळी नवाब मलिकांना अटक करण्यात आली. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम आणि त्याची बहीण हसीना पारकर हिच्याशी आर्थिक व्यवहार केल्याप्रकरणी त्यांच्यावर आरोप करण्यात आला.