मुंबई: गोवा क्रुज ड्रग्स पार्टी प्रकरणानंतर एनसीबी अधिकारी समीर वानखेडे आणि महाराष्ट्र सरकारमधील अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्यात आरोप-प्रत्यारोपांचे सत्र सुरू आहे. मागील काही दिवसांपासून नवाब मलिक समीर वानखेडेंवर अनेक गंभीर आरोप करत आहेत. यात बनावट कागदपत्राद्वार नोकरी मिळवणे, धर्म बदलणे अशाप्रकारचे आरोप आहेत. या आरोपांना वानखेडे कुटुंबाकडून स्पष्टीकरणही देण्यात येतंय. पण, आता आज या सर्व प्रकरणावर नवाब मलिक यांनी लोकमतशी सविस्तर चर्चा केली. यात त्यांनी अनेक महत्वाच्या मुद्द्यांवर भाष्य केलं आहे.
क्रांती रेडकरबाबत कधीच बोललो नाहीनवाब मलिक यांच्या आरोपांवर समीर वानखेडे यांची पत्नी क्रांती रेडकर आणि बहिण जास्मिन यांच्याकडून स्पष्टीकरण देण्यात आलं. त्याबाबत बोलताना मलिक म्हणाले की, मी समीर वानखेडे यांच्या बोगस प्रकरणांवर आणि त्यांच्या फर्जीवाड्यावर आरोप करत आहे. मी चुकीचे आरोप करत नाही, पुराव्यासह बोलतोय. मी कधीच वानखेडेंच्या कुटुंबावर बोललो नाही, त्यांच्या पत्नी क्रांती रेडकरचे नाव घेतले नाही, असं मलिक म्हणाले.
वानखेडेंनी एका दलित उमेदवाराची नोकरी घेतलीमलिक पुढे म्हणाले की, या भारतात कुणीही कोणताही धर्म स्विकारू शकतो, त्याला कायद्याने अधिकार दिलाय. पण, वानखेडेंनी बनावट कागदपत्रांद्वारे नोकरी मिळवली. ते मुस्लिम असूनही त्यांनी दलित असल्याचे दाखवले आणि नोकरी मिळवली. त्यांनी बनावट कागदपत्र सादर करुन एका होतकरु दलित उमेदवाराची नोकरी हिसकावली. याबाबत मी बर्थ सर्टीफीकेट आणि लग्नाचे पुरावेही समोर आणले. हे पुरावे समोर आणल्यानंतर त्यांनी हिंदू-हिंदू सुरू केले. वानखेडे मुस्लिमच आहेत, पण अडकत असल्याचं समजल्यावर हळुहळू हिंदू होत गेले. याची निश्चित नोकरी जाणार आहे. अशा बोगस माणसाला शिक्षा झालीच पाहिजे, असेही मलिक यावेळी म्हणाले.