मुंबई : मुंबई क्रूझ ड्रग्ज प्रकरणावरून राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक आणि एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडेसमीर वानखेडे यांच्यात गेल्या काही दिवसांपासून आरोप-प्रत्यारोप सुरू आहे. नवाब मलिक दररोज समीर वानखेडे यांच्यावर आरोप करत आहेत. दरम्यान, आता नवाब मलिक यांनी आज पुन्हा एक ट्विट करून समीर वानखेडे यांची पत्नी अभिनेत्री क्रांती रेडकर यांच्यावर निशाणा साधला आहे.
मंगळवारी नवाब मलिक यांनी क्रांती रेडकर यांचे एक चॅट ट्विटद्वारे समोर आणले आहे. या चॅटमध्ये कॅप्टन जॅक स्पॅरो नामक एका व्यक्ती क्रांती रेडकर यांना नवाब मलिक आणि अंडरवर्ल्ड डॉन दाऊद यांच्यातील संबंधांचे पुरावे देण्याबद्दल बोलत आहे. त्यावर, हे पुरावे पाठवल्यास तुला बक्षीस दिले जाईल, असा रिप्लाय क्रांती रेडकर यांनी दिल्याचे दिसून येत आहे. नवाब मलिक यांनी हे चॅट ट्विट करत 'ओह... माय गॉड' अशी प्रतिक्रिया दिली आहे.
याचबरोबर, दुसरे ट्विट नवाब मलिक यांनी मजेशीर केले आहे. यात क्रांती रेडकरला पाठवलेल्या चॅटमध्ये कॅप्टन जॅक स्पॅरो यांनी नवाब मलिक आणि राज बब्बर यांचा फोटो पोस्ट केला आहे आणि म्हटले आहे की, राज बब्बर यांची पत्नी त्यांना प्रेमाने दाऊद म्हणते. हे ट्विट पोस्ट करत 'काय विनोद आहे, मला आज सकाळी मिळाला. आनंद घ्या... सर्वांचा दिवस चांगला जावो' अशी प्रतिक्रिया नवाब मलिक यांनी दिली आहे.
दुसरीकडे, क्रांती रेडकर यांनीही ट्विट करत नवाब मलिक यांच्या पोस्टबाबत मुंबई सायबर क्राइम सेलकडे तक्रार दाखल करणार असल्याचे म्हटले आहे. क्रांती रेडकर यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, "हे चॅट्स चुकीचे तयार केले आहेत आणि पूर्णपणे खोटे आहेत. माझे आजवर कोणाशीही असे संभाषण झालेले नाही. पुन्हा एकदा पडताळणी न करता केलेल्या पोस्ट. मुंबई सायबर क्राइम सेलकडे तक्रार दाखल करणार. समर्थकांनी काळजी करू नये, ही आमची संस्कृती किंवा आमची भाषाही नाही."
दरम्यान, समीर वानखेडे हे भ्रष्टाचारी आणि खंडणीखोर अधिकारी असून त्यांनी अनेक निर्दोष लोकांना खोट्या ड्रग्ज प्रकरणात अडकवल्याचा नवाब मलिक यांचा दावा आहे. तसेच, समीर वानखेडे हे जन्माने मुस्लीम आहेत आणि त्यांनी बोगस जात प्रमाणपत्र सादर करून मागासवर्गीयांच्या आरक्षणात घुसखोरी केली व सरकारी नोकरी मिळवली, असा नवाब मलिक यांचा दावा आहे. हा वाद मुंबई हायकोर्टात गेला आहे.
याप्रकरणी समीर वानखेडे यांचे वडील ज्ञानदेव वानखेडे यांनी नवाब मलिक यांच्याविरोधात सव्वा कोटीचा मानहानीचा दावा दाखल केला आहे. त्यांच्या याचिकेवर सुनावणी करताना समीर वानखेडे यांच्या विरोधात बोलण्यापासून नवाब मलिक यांना रोखता येणार नाही, असे मुंबई हायकोर्टाने म्हटले आहे. तसेच, नवाब मलिक यांना यापुढे माहितीची खातरजमा करूनच ट्विट करण्याचे मुंबई हायकोर्टाने निर्देश दिले आहेत.