लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : राष्ट्रवादीचे नेते व माजी मंत्री नवाब मलिक यांचा दीड वर्षांनंतर तुरुंगातून सुटण्याचा मार्ग मोकळा झाला असताना बाहेर आल्यानंतर ते शरद पवार गटात जातील की अजित पवार गटात याबाबत उत्सुकता आहे. दोन्ही गटांनी त्यांच्या जामिनाचे स्वागत केले; दोनपैकी केवळ अजित पवार गटाने मंत्रालयाजवळील पक्ष कार्यालयासमोर फटाके फोडून जल्लोष केला. आता ते कोणासोबत जाणार याची चर्चा सुरू झाली आहे.
अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनी ट्विट करत मलिकांच्या जामिनाचे स्वागत केले. हे करताना नवाब मलिक आमचे ज्येष्ठ नेते असल्याचा उल्लेख पटेल यांनी केला आहे. वैद्यकीय उपचारांसाठी त्यांंना हा तात्पुरता जामीन मिळाला आहे, हा कालावधी त्यांना योग्य उपचार घेण्यास उपयुक्त ठरेल, असे पटेल यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. तर, नवाब मलिक यांना बाहेर येऊ द्या, ते कोणाच्या गटात हे नंतर कळेल. मलिकांच्या सुटकेचा आम्हाला आहे. जल्लोष मनातून असतो, दाखवायचा नसतो, असा टोला राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवार गटाला लगावला.
...तर काय असेल भाजपची प्रतिक्रिया नवाब मलिक हे अजित पवार गटासोबत जाण्याची शक्यता अधिक आहे. या गटाच्या एका ज्येष्ठ नेत्याने ‘लोकमत’शी बोलताना तसा दावा केला. ते अजित पवार यांच्यासोबत गेले तर भाजपची काय प्रतिक्रिया असेल याबाबतही उत्सुकता राहील.
अजित पवार गटाचा जल्लोषनवाब मलिक यांचा तुरुंगातून सुटण्याचा मार्ग मोकळा झाल्यानंतर अजित पवार गटाने मंत्रालयासमोर फटाके फोडून व पेढे वाटून मलिक यांच्या सुटकेचा आनंद व्यक्त केला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि मुंबई कार्याध्यक्ष नरेंद्र राणे व पदाधिकारी उपस्थित होते.
सिब्बल यांचा युक्तिवादईडीची बाजू मांडणारे सॉलिसीटर जनरल तुषार मेहता यांनी मलिक यांना दोन महिन्यांचा जामीन देण्याच्या प्रस्तावावर कोणताही आक्षेप घेतला नाही. मलिक यांच्या वतीने ज्येष्ठ विधिज्ञ कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद केला. नबाब मलिक गेल्या सोळा महिन्यांपासून मूत्रपिंड आणि इतर आजारांवर उपचार घेत असल्याचे सिब्बल यांनी सांगितले.