मुंबई - देवेंद्र फडणवीस यांनी आज आरोपांचा बॉम्ब फोडताना नवाब मलिक यांच्यावर त्यांचा अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचा गंभीर आरोप केला होता. फडणवीस यांनी यासंदर्भातील कागदपत्रेही पत्रकार परिषदेमधून माध्यमांसमोर ठेवली. दरम्यान, नवाब मलिक यांनी फडणवीस यांच्या आरोपांना ट्विट करून उत्तर दिले आहे. मलिक यांनी आ रहा हूँ मै, असे ट्विट करत फडणवीस यांना पत्रकार परिषदेमधून प्रत्युत्तर देण्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे आता फडणवीस यांनी केलेल्या आरोपांवर नवाब मलिक काय बोलतात आणि फडणवीसांना काय प्रत्युत्तर देतात. याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, दिवाळीनंतर बॉम्ब फोडण्याचा इशारा देणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांनी आज नवाब मलिक यांच्यावर गंभीर आरोप केले. आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मुंबईतील १९९३ बॉम्बस्फोटातील आरोपींकडून मंत्री नवाब मलिकांनी कुर्ला येथे जमीन खरेदीचा व्यवहार केला होता. बॉम्बस्फोटातील आरोपींविरोधात टाडा लागला होता. टाडा लागलेल्या आरोपीची संपत्ती जप्त केली जाते. त्यामुळे ही मालमत्ता जप्त होऊ नये म्हणून मलिकांनी कमी किंमतीत ही जागा खरेदी केली का? २००३ मध्ये नवाब मलिक मंत्री होते. मलिकांचा थेट अंडरवर्ल्डशी संबंध होते. १९९३ च्या बॉम्बस्फोटात अनेक निष्पापांचे बळी गेले. ज्या लोकांनी स्फोट घडवले. रेकी केली या लोकांसोबत जमीन व्यवहार करण्यामागे काय हेतू होता? असा सवाल त्यांनी केला.
तसेच केवळ १ संपत्ती नव्हे तर अशा ५ मालमत्ता आहेत ज्यात अंडरवर्ल्डचा संबंध आहे. माझ्यासाठी सलीम जावेदचा सिनेमा नाही. माझ्याकडे जे पुरावे आहेत ते तपास यंत्रणांना देणार आहे. हे पुरावे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनाही देणार आहे. NCP मंत्री काय कांड करतात हे त्यांनाही माहिती कळू द्या असा टोलाही देवेंद्र फडणवीसांनी लगावला आहे.