मुंबई - बॉलीवुड सुपर स्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला (Aryan Khan) ड्रग्स प्रकरणात अटक झाल्यापासूनच, अल्पसंख्याक विकासमंत्री नवाब मलिक (Nawab Malik) एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्यावर गंभीर आरोप करताना दिसत आहेत. यामुळे राज्यात मलिक विरुद्ध वानखेडे, असे चित्रही पाहायला मिळाले. मलिकांच्या आरोपांनंतर आता एनसीबीने (NCB) मोठा निर्णय घेत, वानखेडे यांच्याकडून आर्यन खान ड्रग्स प्रकरणा शिवाय आणखी 5 केसेसचा तपास काढून घेतला आहे. (Sameer Khan's case handed over to Delhi NCB team)
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी वानखेडे यांच्यावर वसूलीसह अनेक अरोप केले होते. एनसीबीचे साउथ-वेस्टर्न रिजनचे डेप्युटी डीजी मुथा अशोक जैन यांनी म्हटले आहे, की आर्यनसह एकूण 6 प्रकरणांची चौकशी आता दिल्लीची टीम करेल. नवाब मलिक यांच्या जावयाशी संबंधित प्रकरणाची चौकशीही एनसीबीचे झोनल डायरेक्टर वानखेडे यांच्या ऐवजी आता दिल्लीची टीमच करेल.
एनसीबीच्या या निर्णयानंतर, नवाब मलिकांनी ट्विट केले, की “समीर वानखेडे यांच्याकडून आर्यन खान प्रकरणासह 5 खटले मागे घेण्यात आले आहेत. अशी 26 प्रकरणे आहेत, ज्यांची चौकशी आवश्यक आहे. ही तर फक्त सुरूवात आहे. ही यंत्रणा स्वच्छ करण्यासाठी अजून बरेच काही करावे लागेल आणि आम्ही ते करू.” एनसीबीचे एक पथक या प्रकरणांचा तपास आपल्या हाती घेण्यासाठी शनिवारी मुंबईत पोहोचेल.
मला हटवलं गेलं नाही, मीच कोर्टाकडे केली होती मागणी - वानखेडेआर्यन खान प्रकरणापासून हटविल्याच्या बातम्या आल्यानंतर, एएनआयसोबत बोलताना समीर वानखेडे म्हणाले, ''मला तपासापासून हटविले गेले नाही. या प्रकरणाची चौकशी केंद्रीय एजंसीकडून करण्यात यावी, यासाठी मी कोर्टात रिट पिटिशन दिले होते. यामुळे आर्यन केस आणि समीर खान (Sameer Khan) (नवाब मलिक यांचा जावई) प्रकरणाचा तपास आता दिल्ली एनसीबीची एसआयटी करेल. हा दिल्ली आणि मुंबई एनसीबीच्या टीममध्ये समन्वय आहे.''