आॅनलाइन लोकमतसातारा, दि. 16 - निवृत्त नौदल कमांडर कुलभूषण जाधव यांच्या सुटकेसाठी जावळीकर एकवटले आहेत. सायगाव भागातील युवकांनी रविवारी निषेध मोर्चा काढून पाकिस्तानच्या विरोधात घोषणा दिल्या. यावेळी पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन केले.निवृत्त कमांडर अधिकारी कुलभूषण जाधव यांनी तालुक्यातील आणेवाडीत शेती घेऊन त्यात घर बांधून काही काळ राहत होते. या काळात त्यांनी तरुणांमध्ये देशभक्तीचे संस्कार केले. जाधव यांना पाकिस्तान सरकारने हेरगिरीच्या आरोपाखाली मृत्युदंडाची शिक्षा सुनावली. यामुळे जावळीच्या सुपुत्रासाठी जावळीकर एकवटू लागले आहेत. अनेक ठिकाणी मोर्चे काढून पाकिस्तानच्या विरोधात घोषणाबाजी केली जात आहे.पाकिस्तान सरकारच्या निषेधार्थ सायगाव पंचक्रोशीतील युवकांनी एकत्र येऊन रविवारी निषेध मोर्चा काढला. पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांचा प्रतीकात्मक पुतळा जाळून पाकिस्तान मुर्दाबाद, पाकिस्तान हाय-हाय, भारत सरकार आगे बढ़ो या घोषणा दिल्या. यावेळी मर्ढे, आनेवाडी, सायगाव, खर्शी, दरे खुर्द या गावातील असंख्य युवक सहभागी झाले होते. भाजपचे जिल्हा परिषद गट नेते दीपक पवार म्हणाले, जावळीचे सुपुत्र आणि अभिमान असलेले कुलभूषण जाधव हे निर्दोष असून, त्यांना खोट्या आरोपाखाली अटक करून फाशीची शिक्षा सुनावली. या निर्णयाचा आम्ही जावळीकर जनता निषेध करीत आहोत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांना कुलभूषण यांच्या सुटकेसाठी निवेदन पाठवणार आहोत. जावळी शिवसेना प्रमुख प्रशांत तरडे म्हणाले, भारत सरकारने कुलभूषण जाधव यांच्यासाठी प्रयत्न करून त्यांना भारतात परत आणावे. मोर्चात सतीश भोसले, लक्ष्मण भोसले, सचिन भोसले, सुहास भोसले, प्रमोद दीक्षित, दीपक देशमाने, रोहन भोसले, जितेंद्र शिंगटे, जितेंद्र गायकवाड यांच्यासह असंख्य युवक सहभागी झाले होते.शूरवीरासाठी कडक पावले उचलाशहीद तुकाराम ओंबळे यांच्या तालुक्यातील या अधिकाऱ्याने देशासाठी कित्येक वर्षे आपली सेवा देऊन निवृत्तीनंतरही सामाजिक कार्यात स्वत:ला झोकून दिले होते. या शूरवीरासाठी सरकारने कडक पावले उचलून त्यांना पाकिस्तानच्या ताब्यातून लवकरात लवकर सोडवून आणावे, अशी मागणी यावेळी उपस्थित युवकांनी केली.
नवाज शरीफ यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2017 7:00 PM