भंडारा : नक्षलवाद्यांचा रेस्ट झोन म्हणून ओळखल्या जाणा-या नागझिरा परिसरात नक्षलवादी पुन्हा सक्रिय झाल्याचे दिसून येत आहे. दरम्यान ३१ डिसेंबरच्या पहाटेच्या सुमारास साकोलीकडून नागझिराकडे जाणा-या पिटेझरी मार्गावर लाल सलाम-नागझिरा बंद, दम है तो नागझिरा आओ लाल सलाम, असे लिहिलेले फलक आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.लाल कपड्यावर नागझिरा बंद लिहिलेले जमनापूर व पिटेझरीकडे जाणा-या टी-पार्इंटवर हे बॅनर तुली सुटसच्या लोखंडी खांबाला बांधलेले आढळून आले. मात्र हे बॅनर कोणत्या दलमने लावले, याचा कुठेही उल्लेख नाही. त्यामुळे हे बॅनर नक्षल्यांनी लावले की कुणी खोळसाळपणा केला, या दिशेने पोलीस प्रशासनाकडून शोध घेण्यात येत आहे.
बॅनर लावलेल्या परिसरात जिल्हा पोलीस अधीक्षक विनिता साहू यांच्यासह भंडारा व साकोली पोलिसांची कुमक तैनात आहे. साकोलीचे उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीकांत डिसले यांच्याशी संपर्क साधला असता घटनास्थळावर असल्याचे सांगून माहिती नंतर देत असल्याचे सांगितले.टी-पॉर्इंट परिसरात दोन बॅनर्स लावलेले दिसून आले. हे बॅनर्स कुणी लावले याचा शोध घेणे सुरू आहे. याठिकाणी पोलिसांना अलर्ट करण्यात आले आहे. भंडारा जिल्ह्यात नक्षली कारवाया नाहीत. आॅपरेशन डिटेल्सची माहिती देता येऊ शकणार नाही.- विनिता साहू, जिल्हा पोलीस अधीक्षक भंडारा