भामरागड (गडचिरोली) : कोठी मार्गावरील हेमलकसा ते कारमपल्ली या गावांदरम्यान नक्षल्यांनी बुधवारी रात्री भूसुरुंगाचा स्फोट घडवून पोलिसांचे भूसुरुंगरोधक वाहन उडविले. यामध्ये एक जवान शहीद झाला, तर अन्य १९ जवान गंभीर जखमी झाले. वाहन उलटताच जंगलात दबा धरून बसलेल्या नक्षल्यांनी जखमी पोलीस जवानांच्या दिशेने बेछूट गोळीबार केला. मात्र, पोलीस जवानांनी शूरतेने लढा देत नक्षल्यांचा हल्ला परतवला. त्यांना वाहनाच्या जवळपास पोहोचू दिले नाही.त्याचबरोबर भामरागडवरून घटनास्थळाकडे रवाना झालेल्या पोलीस पार्ट्या घटनेनंतर अर्ध्या तासातच पोहोचल्या. त्यामुळे छत्तीसगड राज्यातील सुकमा येथे घडलेल्या घटनेची पुनरावृत्ती टळली, अशी माहिती या स्फोटात जखमी झालेल्या पोलीस जवानांनी दिली.भामरागड तालुक्यातील नारगुंडा-कोठी जंगल परिसरात बुधवारी सी-६० पोलीस जवान नक्षल शोधमोहीम राबवित होते. दुपारी २च्या सुमारास पोलीस जवान व नक्षलवादी यांच्यात चकमक उडाली. या चकमकीत तीन पोलीस जखमी झाले. त्यांना हेलिकॉप्टरने छत्तीसगड राज्यातील रायपूर येथील रुग्णालयात नेण्यात आले. उर्वरित जवान भूसुरुंगरोधक वाहनाने भामरागडकडे परत येत होते. हेमलकसा ते कारमपल्ली गावांदरम्यान शेतात सुमारे ७०-८० नक्षली दबा धरून बसले होते. रात्री कारमपल्लीच्या पुलाजवळ पोलिसांचे वाहन पोहोचताच नक्षल्यांनी भूसुरुंग स्फोट घडवून आणला. या स्फोटात सुरेश लिंगा तेलामी हा जवान शहीद झाला. तर अन्य १९ जवान जखमी झाले. (प्रतिनिधी)१५ जखमींवर नागपुरात उपचारनक्षलवादी हल्ल्यात जखमी झालेल्या १५ जवानांना गुरुवारी सकाळी नागपुरातील ‘क्युअर इट मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल’मध्ये दाखल करण्यात आले. यातील चार जवानांवर तातडीची शस्त्रक्रिया करण्यात आली असून, दोघांची प्रकृती गंभीरआहे. तर दहा सैनिकांची प्रकृती स्थिर आहे. याशिवाय सैनिकांची नावे व इतर माहिती देण्यास हॉस्पिटलने टाळले.
जखमी होऊनही परतवला नक्षली हल्ला
By admin | Published: May 05, 2017 3:48 AM