- जितेंद्र कालेकरठाणे, दि.09 - गांजा तस्करीमध्ये तेलंगणा तसेच विशाखापट्टणम भागातील नक्षलवाद्यांचे थेट कनेक्शन असल्याची माहिती ठाणे पोलिसांच्या चौकशीत उघड होत आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून कनिसा खैरुल ही हैद्राबादच्या अण्णा उपेंद्र या मुख्य तस्कराकडून गांजा आणून त्याची ठाणे आणि मुंबई परिसरात विक्री करीत होती.तो स्थानिक नक्षलवाद्यांशी संगनमत करुन गांजाची तस्करी करीत होता. दरम्यान, कनिसा हिला १९ आॅगस्टपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.सात महिन्यांपूर्वी अंमली पदार्थ विरोधी पथकाचे उपनिरीक्षक मनोहर घाडगे यांच्या पथकाने नरसय्या आणि रामोजी या दोघांना अटक केली होती. त्यांच्याकडूनही ३० किलो गांजा हस्तगत केला होता. या दोघांनीही हैद्राबादच्या अण्णाकडून गांजाचा माल आणल्याचे उघड झाले होते. तेंव्हापासून अण्णा आणि त्याच्या साथीदारांचा ठाणे पोलीस शोध घेत आहेत. ६ आॅगस्ट २०१६ रोजी उपनिरीक्षक अमोल वालझाडे यांच्या पथकाने कळवा भागातून १५० किलोच्या गांजासह अटक केलेल्या कनिसानेही हैद्राबाद येथून माल आणला होता. तिने हा माल नेमकी कोणाकडून आणला, कोणा कोणाला ती हा माल वितरीत करणार होती, याची माहिती अद्यापही तिने पोलिसांना दिली नाही. प्रत्येक प्रश्नाला ती असंदिग्ध उत्तरे देत आहे. आयुर्वेदीक औषधे विशाखापट्टणम येथून आणायची असल्याचे सांगून तिने एक कार भाड्याने घेतली होती. कारसह तिला पकडल्यानंतर गाडीत गांजा असल्याचे या कारच्या चालकाला समजल्याचे तपासात उघड झाले. आता या कारचालकाला या प्रकरणात साक्षीदार करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. कनेक्शन नक्षलवाद्यांशी?कल्याणमधील दोघे आणि आता कळव्यात पकडलेल्या कनिसाच्या चौकशीत ज्या अण्णाचे नाव पुढे आले आहे. त्याचे तेलंगणा, हैद्राबाद आणि विशाखापट्टणमच्या नक्षलवाद्यांशी ‘संबंध’ असून त्यांच्याकडून तो गांजाची तस्करी करीत असल्याची माहिती पुढे आली आहे. विशाखापट्टणमच्या जंगलातील वनजमिनी आदीवासींना धमकावून नक्षलवादी ताब्यात घेतात. त्याच जमिनीवर गांजाची शेती करुन तिची तस्करी करतात. हाच पैसा नक्षली कारवायांसाठीही वापरला जातो. या अण्णाच्या संपर्कात कनिसासारख्या आणखी कोण महिला किंवा तस्कर आहेत? त्याचाही शोध घेण्यात येत आहे. अण्णाचा विमान प्रवासज्या अण्णाचे नाव या प्रकरणात समोर आले आहे. तो मुंबई ते नागपूर तसेच अन्य ठिकाणी केवळ विमानाने प्रवास करतो. देशभरातून ठराविक जणांची निवड करुन तो छुप्या मार्गाने गांजाची तस्करी करतो. त्यानंतर विमान प्रवास करुन या तस्करीचा हिशेब घेऊन तो परतत असल्याचीही माहिती सूत्रांनी दिली. एका वेळी ५ किलोचा गांजा तो कनिसासह त्याच्या साथीदारांना देत होता. हैद्राबाद ते मुंबई, ठाण्याची डिलीव्हरी करण्यासाठी तो एका विक्रेत्यासाठी पाच हजार रुपये एका फेरीसाठी देत असे. अशी वाढत जाते गांजाची किंमतसुरुवातीला तेलंगणात दोन हजार रुपये किलोने गांजा विकला जातो. तिथून हैद्राबादमध्ये गांजा तस्करांकडून पाच हजार रुपये किलोने घेतलेला गांजा महाराष्ट्रात आल्यानंतर सोलापूरमध्ये आठ हजार रुपये, पुढे सोलापूर ते कल्याणमध्ये दहा हजारांचा भाव त्याला मिळतो. तर ठाण्यात १२ हजार आणि मुंबईत येईपर्यत तो १५ हजार रुपये किलोच्या होलसेल दराने विकला जातो. पुढे ही किंमत १५ ते २० हजारांच्या घरात जाते, अशी माहिती सूत्रांनी दिली.