गोंदिया: चिचगड पोलिस ठाण्यांतर्गत येणाऱ्या इस्तारी जंगल परिसरात नक्षलवाद्यांनी घातपात करण्यासाठी स्फोटक दगडाच्या मधात ठेवले होते. परंतु पोलिसांनी नक्षलवाद्यांचा हा कुटील डाव उधळला. नक्षल शोध मोहीम राबविणारे पोलीस रविवारी जंगलात गेले असता दुपारी २ वाजताच्या दरम्यान इस्तारी येथील जंगलात दोन दगडाच्या मधात चार नग झिलेटिंग कांड्या, पाच नग विद्युत डेटोनेटर, वायरसह लाऊन ठेवले होते. पोलिसांच्या सतर्कतेने घातपाताचा डाव उधळला गेला. चिचगड येथील पोलीस निरीक्षक अशोककुमार तिवारी यांच्या तक्रारीवरुन नक्षलवाद्यांविरुद्ध भारतीय स्फोटक कायदा कलम ४,५ बेकायदेशीर हालचाली प्रतिबंधक कायदा १८,२०,२३ सहकलम १३५ महाराष्ट्र पोलीस कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात केकेडी दलमचे रामदास उर्फ रामजी पिटे हलामी, जगदीश उर्फ रमेश सुखलाल भवरसिंह टेकाम, स्वरुपा उर्फ वंदना, माधुरी उर्फ कमला नरोटी, मिना महेश उर्फ विजय, विनू उर्फ कोवाची, प्लाटून ५५ चे सुखदेव उर्फ लक्ष्मण, डेवीड उर्फ उमेश उर्फ अज्ञान उर्फ बळीराम उर्फ उईके, विनोद उर्फ दावेनशेर पुराम कोरेटी, नानसू वडे, मंगेश उर्फ अशोक उर्फ प्रेमकुंभरे, विधु गावळे, सतू उर्फ तिजूलाल कोरेटी, सागर, विमला सुखराम गोधा व इतर नक्षलवाद्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (तालुका प्रतिनिधी)