गडचिरोली : अहेरी तालुक्यातील पेरमिली वनपरिक्षेत्र कार्यालय तसेच धानोरा तालुक्यातील दुर्गापूर ग्राम पंचायत कार्यालयामधील दस्तावेज व फर्निचर नक्षलवाद्यांनी मध्यरात्री जाळून टाकले. भामरागड-आलापल्ली मार्गावर पेरमिली येथे नक्षलवाद्यांनी बुधवारी रात्री वनपरिक्षेत्र कार्यालय गाठले. नक्षलवाद्यांनी दार तोडून कार्यालयात प्रवेश केला आणि तेथील साहित्य व दस्तावेज पेटवून दिले. या घटनेत संगणक, प्रिंटर, सीपीयू, झेरॉक्स मशीन, इर्न्व्हटर, दोन बॅटऱ्या, दोन कपाटे, १५० खुर्च्या व अन्य सामग्री भस्मसात झाले. २००५ मध्येही नक्षलवाद्यांनी हे वनपरिक्षेत्र कार्यालय जाळले होते. तर, रात्री ११च्या सुमारास धानोरा तालुक्यातील दुर्गापूर ग्रामपंचायतीच्या इमारतीत घुसून नक्षलवाद्यांनी तेथील दस्तावेज व फर्निचर जाळून टाकले. तेथे नक्षलवाद्यांनी कोंडेकल जंगल परिसरात या आठवड्यात झालेल्या चकमकीच्या घटनेचा निषेध करणारा बॅनर लावला होता. या चकमकीत दोन नक्षलवादी ठार झाले होते. या घटनेच्या निषेधार्थ १० सप्टेंबरला धानोरा तालुका बंद पाळण्यात यावा, असे आवाहन नक्षल संघटनांनी केले आहे. (प्रतिनिधी)
नक्षलवाद्यांनी जाळले वन कार्यालय आणि ग्रामपंचायत
By admin | Published: September 11, 2015 3:38 AM