रेपनपल्ली येथील घटना : आमदार थोडक्यात बचावले
ऑनलाइन लोकमत
गडचिरोली, दि. १४ : अहेरी तालुक्याच्या रेपनपल्ली पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या छल्लेवाडा येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचा कार्यक्रम सुरू असताना नक्षलवाद्यांनी अहेरीचे माजी आमदार दीपक आत्रम यांच्या सुरक्षा रक्षकावर गोळीबार केला. यात सुरक्षा रक्षक जागीच ठार झाला. सदर घटना दुपारी 1 ते 1.30 वाजताच्या सुमारास घडली.
शहीद झालेल्या सुरक्षा रक्षकाचे नाव नानाजी बरकोजी नागोसे (45) असून ते गडचिरोली पोलीस दलात प्राणहिता पोलीस मुख्यालय अहेरी अंतर्गत हवालदार पदावर कार्यरत होते. मागील तीन वर्षापासून ते माजी आमदार दीपक आत्रम यांच्याकडे सुरक्षा रक्षक म्हणून काम पाहत होते. रेपनपल्ली पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या छल्लेवाडा येथे माजी आमदार दीपक आत्रम, जिल्हा परिषदेचे कृषी व पशुसंवर्धन सभापती अजय कंकडालवार यांच्यासह आविसंचे अनेक कार्यकर्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती कार्यक्रमासाठी गेले होते. या ठिकाणी आठ ते दहाच्या संख्येत नक्षलवादी उपस्थित होते, अशी माहिती आहे.
नागोसे हे कार्यक्रम सुरू असताना बाजुला पाणी पिण्यासाठी गेले व परत कार्यक्रमस्थळाकडे येत असताना नक्षलवादी व त्यांच्या चकमक उडाली. त्यांनी नक्षलवाद्यांचा मुकाबला करण्याचा प्रयत्न केला. तर नक्षलवाद्यांनी त्यांच्यावर सहा गोळ्या झाडल्या. यात ते जागीच शहीद झाले. त्यानंतर नक्षलवादी घनदाट जंगलाच्या दिशेने पळून गेले. शहीद जवान नानाजी नागोसे यांच्या डोक्यावर, छातीवर नक्षलवाद्यांनी गोळ्या झाडल्या व त्यांच्याजवळील रायफल व काडतूस घेऊन पळून गेले. रेपनपल्ली येथून शहीद नागोसे यांचा मृतदेह हेलिकॉप्टरच्या सहाय्याने गडचिरोली येथे आणण्यात येणार असल्याची माहिती आहे. (तालुका प्रतिनिधी)