धानोरा (गडचिरोली) : मोठा घातपात घडवून आणण्याच्या उद्देशाने नक्षल्यांनी पेरलेले भूसुरूंग स्फोटके जिल्हा पोलीस व सीआरपीएफ जवानांनी निकामी केले. सदर घटना धानोरा तालुक्यातील ग्यारापत्ती-सावरगाव मार्गावर बुधवारी घडली.
नक्षलविरोधी अभियान राबवित असताना बुधवारी जिल्हा पोलीस व केंद्रीय राखीव दलाच्या ११३ बटालियनच्या जवानांना ग्यारापत्ती-सावरगाव मार्गावरील कनगडी गावाजवळ १५ किलो वजनाची स्फोटके पेरुन ठेवल्याचे आढळून आले.
बुधवारी सकाळी सीआरपीएफच्या ११३ बटालियनचे जवान नक्षलविरोधी अभियानावर निघाले असता कनगडी गावाजवळ आयईडी स्फोटके पेरुन ठेवल्याचे निदर्शनास आले. सीआरपीएफच्या जवानांनी बॉम्ब शोधक व नाशक पथकाच्या जवानांना पाचारण करुन ही स्फोटके बाहेर काढली. जवळपास १५ किलो स्फोटके त्यात आढळून आली. नंतर ती नष्ट करण्यात आली. यामुळे मोठा अनर्थ टळला. ११३ बटालियनचे कमांडंट एन. शिवशंकरा यांच्या मार्गदर्शनाखाली उपकमांडंट प्रमोद सिरसाट, निरीक्षक ननैया, पोलीस उपनिरीक्षक के. डी. ढेरे व पोलीस जवानांनी कामगिरी बजावली. कनगडी भागात नक्षलविरोधी अभियान तीव्र करण्यात आले आहे.