सांगली : महापालिकेचे रस्त्यांवरील खड्ड्यांवरच विशेष प्रेम असल्याने सांगलीच्या शहर सुधार समितीने या प्रकरणाची गंभीर दखल घेत गुरुवारी महापालिकेचे खड्डेबाईशी लग्न लावून अनोखे आंदोलन केले. संतापाचे सूर, नाराजीच्या अक्षता आणि अमंगलाष्टकांच्या साथीने हा विवाह सोहळा पार पडला. सोहळ्याला नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. विश्रामबाग येथील दत्तनगर चौकातील ८० फुटी रस्ता वर्षानुवर्षे खड्डेयुक्त असल्याने व अनेकदा मंजूर असूनही त्याचे काम न झाल्याने सांगली जिल्हा सुधार समिती व स्थानिक नागरिक यांनी मिळून आज अनोखे आंदोलन केले. सांगली महापालिका व विश्रामबागच्या ८० फुटी रस्त्याच्या खड्ड्यांचे विधिवत लग्न लावून प्रशासनाचा निषेध केला. सांगलीतील विश्रामबागच्या या रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे अनेक नागरिकांना अपघात झाले आहेत. अनेक वर्षांपासून हे रस्ते मंजूर असल्याबाबत व निविदा प्रसिद्ध झाल्याबाबत महापालिका प्रशासनामार्फत सांगितले जात आहे, परंतु आजपर्यंत कोणतीही कार्यवाही या रस्त्याच्याबाबतीत झालेली नाही. सर्वच नागरिक प्रचंड संतप्त झाले आहेत. या संतापाची दलख घेत सांगली जिल्हा सुधार समितीने महापालिकेचे खड्ड्यांसोबत लग्न लावून दिले. या विवाह सोहळ््यात महापालिका प्रशासनाचा, निष्क्रिय नगरसेवकांचा निषेध केला.यावेळी सुधार समिती कार्याध्यक्ष अॅड. अमित शिंदे, सुरेश मुत्तलगिरी, सुधीर भोसले, विनोद कल्याणी, संतोष भोसले, सतीश जगदाळे, राहुल देवकाते, अजय लोंढे, गोरख पाटील, नीलेश खोत, नाना कनवाडकर, अर्चना मुळे, स्वप्नाली चव्हाण, अॅड. अरुणा शिंदे, महादेव कुलकर्णी, बाळासाहेब कुमे, अजय देशमुख व दत्तनगर, सर्व नागरिक उपस्थित होते.वर महापालिका, वधू खड्डेबाई-चिरंजीव महापालिका व चि. सौ. कां. खड्डेबाई असा उल्लेख करीत या विवाह सोहळ्याची सुरुवात करण्यात आली. या अनोख्या आंदोलनात सहभागी झालेल्या नागरिकांमधून महापालिकेच्या निष्क्रियतेबद्दल संतापही व्यक्त करण्यात आला.
महापालिकेचे खड्डेबाईशी लग्न! सांगलीत अनोखे आंदोलन : विवाह सोहळ्यात अमंगलाष्टके
By ऑनलाइन लोकमत | Published: November 03, 2017 1:12 PM