मराठी साहित्याने निसर्गाची म्हणावी तशी दखल आजवर घेतलेली नाही. मराठी साहित्यात निसर्ग आला तो ‘कॅनव्हास’वर. मात्र, हा निसर्ग साहित्यातून ‘नायक’ म्हणून नाही आला. माझ्या पुस्तकांतून मी निसर्गाला ‘नायक’ म्हणून आणण्याचा प्रयत्न केला जंगले समृद्ध करायची असतील, तर आपल्या साहित्यातून येणारा निसर्ग आता नायकरूपात आणण्याची गरज आहे, असे ठाम मत ज्येष्ठ वनअभ्यासक मारुती चितमपल्ली यांनी मांडले. मराठी भाषा गौरवदिनी राज्य शासनाचा वि.दा. करंदीकर जीवन गौरव पुरस्कार ज्येष्ठ वनअभ्यासक मारुती चितमपल्ली यांना प्रदान करण्यात आला. यानिमित्ताने ‘कॉफीटेबल’अंतर्गत मारूती चितमपल्ली यांच्याशी खास संवाद साधला.राज्य शासनाचा पुरस्कार मिळाला आनंद आहे. २००६ साली मी मुंबईत आलो होतो. तेव्हा विदांची भेट झाली आणि आज मला त्यांच्या नावाच्या पुरस्काराने गौरवण्यात आल्याचा आनंद आहे. मराठी साहित्यात मी निसर्गाची कास धरल्याने माझी वेगळी ओळख आहे. तुम्ही जर पाहिले तर साहित्यात दोन प्रकारांचे निसर्ग आहेत. गो.नी. दांडेकर आणि व्यंकटेश माडगुळकर यांच्या साहित्यातून आलेला निसर्ग हा एका वेगळ्या भूमिकेत आहे. त्यांच्या साहित्यात आलेला निसर्ग हा ‘कॅनव्हास’वरच्या भूमिकेत आहे आणि माझ्या साहित्यात आलेला निसर्ग हा ‘नायका’च्या भूमिकेत आहे.माझ्या लेखनाची सुरुवात किंवा बाळकडू म्हटले, तर ते मला माझ्या आईबाबांकडून मिळाले. मामा आणि आत्याने माझ्या निसर्गज्ञानात भर घातली. म्हणजे त्यांनी मला निसर्ग समजावून सांगितला; नुसता सांगितला नाहीतर मला निसर्ग दाखवला. साहजिकच कालांतराने वनविभागात लागलेली नोकरी माझ्या कामी आली आणि निसर्गाशी माझी जवळीक वाढली किंवा मी निसर्गाशी एकरूप झालो. साहजिकच त्यानंतर माझा पक्षी, प्राणी आणि झाडे यांच्याशी अधिक संबंध आला. वनविभागात काम करताना मी निसर्गाचे सावज म्हणजे निसर्ग टिपू लागलो. पक्षी-प्राण्यांचे आवाज टिपू लागलो. जंगलाची बोलीभाषा म्हणजे आदिवासी बोलीभाषेशी परिचय झाला. साहजिकच भ्रमंती वाढत गेली आणि आलेले अनुभव कागदावर उतरले.माझे गुरू सलीम अली. मला त्यांचा सहवास तब्बल २० वर्षे लाभला. जेव्हा जेव्हा मी मुंबईत म्हणजे कर्नाळा अभयारण्यात येत असे, तेव्हा तेव्हा त्यांचे मार्गदर्शन घेत असे. ६७-६८चे वर्ष असेल ते; या काळात सलीम अली यांनी मला निसर्ग जगायला शिकवला. त्यानंतर साहजिकच निर्माण झालेली गं्रथसंपदा तुम्ही पाहतच आहात. जंगलाचा, पक्ष्यांचा, प्राण्यांचा अभ्यास करताना बारकावे टिपले. आणि साहजिकच हे टिपणे महत्त्वाचे होते. कारण त्याशिवाय लेखन करता आले नसते. उदाहरणच घ्यायचे झाले, तर कोकीळ नर आणि मादीचे घेऊया. या दोघांमध्ये नर गातो. मादीला गाता येत नाही, हे मी लेखनातून सांगितले.दोन लाख झाडांची गरज नक्की कुठे आहेराज्य सरकार दोन लाख झाडे लावते आहे; पण या झाडांची गरज कुठे आहे? याचा विचार केला जात नाही. वनसंपदा कमी होत आहे हे खरे आहे. मात्र, कोणती झाडे लावली पाहिजेत आणि कोणती झाडे लावू नयेत याचा विचार केला पाहिजे. महामार्गावरच्या डिव्हायडरवर फुलझाडे लावून काहीच होणार नाही. येथे निवडुंग लावला पाहिजे. निवडुंगाला पावसाळ्यात एकदा पाणी मिळाले की पुन्हा त्याला पाणी लागत नाही. शिवाय, महामार्गावर निवडुंग लावला तर तो वाहनातून निघणारा कार्बन डायआॅक्साइड शोषून घेईल आणि आॅक्सिजन देईल. आपल्याकडे रस्त्यांवर पुरेसे जंगल आहे; पण त्याकडे आपण लक्ष देत नाही. ब्रिटिश काळाचा उल्लेख करायचा झाला तर त्यांनी वड, पिंपळ यांसारखी झाडे लावली. दुसरे असे की, महामार्गासाठी भूसंपादन करताना त्याचा मोबदला संबंधिताला नीट मिळाला पाहिजे. मग मोबदला कोणत्याही स्वरूपात असो. या बाबी किरकोळ आहेत. मात्र, त्याकडे दुर्लक्ष केले जाते. सिंह हाच आपला प्राणीसगळ्यांनाच वाघ बघायचा आहे; पण वाघ हा आपला प्राणी आहे का? वाघ हा मूळचा चीनचा. तो चीनमधून भारतात आला. तो जेव्हा भारतात आला, तेव्हा त्याने आपल्या सिंहावर आक्रमण केले. सिंह हा आपला प्राणी. त्याने जेव्हा सिंहावर आक्रमण केले ते अगदी उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत. त्यामुळे सिंहांची संख्या कमी होऊ लागली; पण हे कोणीच लक्षात घेत नाही. प्रत्येकाला केवळ वाघ बघायचा आहे. कोणीही जंगलात गेले की, वाघ बघायला मिळेल का? असा सरळ प्रश्न येतो. आपली जंगले समृद्ध आहेत. आपणच ती जपली पाहिजेत. जंगले जपली की साहजिकच प्राणी आणि पक्षी जपले जातील; पण हे एकट्याचे काम नाही, यासाठी आपण सर्वांनी काम केले पाहिजे.सर्पमित्रांची गरज शहरातचभारतात सोळा प्रकारची जंगले आहेत; पण आपल्यापैकी अनेकांनी हे माहीत नाही. जगात कुठेच एवढे जंगल नाही, तेवढे जंगल भारतात आहे. कोकणात तिवरांची जंगले ही खासगी संपत्ती झाली आहे, असे होता कामा नये. राज्य सरकारने ही जंगले आपल्या ताब्यात घेतली पाहिजेत. सर्पमित्रांची गरज गावात नाहीतर शहरात आहे. मात्र, सर्पमित्र जंगलात दाखल होऊन सापांचे विष काढण्याचे काम करत ते विकण्याचे गैरकाम करतात. मी जेव्हा वनाधिकारी होतो, तेव्हा सर्पमित्रांना ओळखपत्र देत नव्हतो.लेखन समृद्ध झालेमला नोकरी लागली तेव्हा माझे पहिले पोस्टिंग महाबळेश्वरला झाले. त्यानंतर वडगाव. असे अनेक मुक्काम मी केले. नोकरी आणि जंगलाच्या प्रवासात गो.नी. दांडेकर यांच्यासारख्या मोठ्या माणसाचा सहवास मला लाभला. महत्त्वाचे म्हणजे मुलकराज आनंद या उर्दू लेखकाचा सहवासही मला लाभला. एवढी मोठी माणसे आणि त्यांचा सहवास लाभल्याने माझे लेखन अधिकच समृद्ध झाले.कोशाचे काम वेगात सुरू तब्बल बारा विद्यार्थ्यांनी माझ्या साहित्यावर पीएच.डी केली आहे. मी आजही बारा बारा तास लेखन करतो. सद्यस्थितीमध्ये वृक्ष, पक्षी, प्राणी आणि मत्स्य कोशाचे काम सुरू आहे. हे सर्व कोशाचे कामकाज मी एकटा करतो आहे. या कोशामध्ये एक लाखांहून अधिक शब्दांची भर पडणार आहे. हे कोश पूर्ण होतीलच. मात्र, त्याला अवकाश आहे.देवराई, जंगले आपण गमावलीआपल्याकडे मोठ्या प्रमाणावर देवराई होती. मात्र, आता ती नष्ट झाली आहेत. आपण आपली देवराई तोडली आहे. अगदी बौद्ध काळातली देवराई, जंगले आपण गमावून बसलो आहोत. मी जेव्हा जंगलात काम केले, तेव्हा जंगलातला प्राणी कधीच बाहेर गेला नाही, कारण मी त्यांच्यासाठी जंगल पूरक बनवण्याचे काम केले.डायरीचा आधार लेखक होण्यासाठी झालामाझे बालपण सोलापूरला गेले. माझी आत्या कुंभारवाड्यात राहायची. आत्याने मला अर्धाधिक निसर्ग साध्या, सोप्या भाषेत सांगितला. पक्षी घरटी कधी बांधतात; इथपासून पक्ष्यांच्या नावांची माहिती मला आत्याने दिली. नवेगावात असताना माझी आदिवासी बांधवांशी आणखी जवळीक वाढली. साहजिकच मला त्याचा फायदा झाला आणि निसर्ग आणखी जवळून समजला. लेखक होण्यापूर्वी मी डायरी लिहायचो. माझ्या डायरीतल्या नोंदी पक्क्या असायच्या आणि याच डायरीचा आधार पुढे मला लेखक होण्यासाठी झाला.वाघ/बिबट्यांचा गावांमधील प्रवेशराष्ट्रीय उद्याने असोत किंवा अभयारण्ये असोत. येथे रानमुळे वाढली आहेत. येथील गवत नाहीसे होत आहे. परिणामी, जंगलातले शाकाहारी प्राणी शेतीकडे येत आहेत आणि त्यामुळे शेतीचे नुकसान होत आहे. यासाठी आपण अभयारण्ये किंवा जंगलातले गवत वाढवण्यासाठी काम केले पाहिजे. रानटी गवत वाढल्याने जंगलातल्या प्राण्यांना पुरेसे गवत मिळत नाही. अशाने त्यावरील अवलंबून प्राण्यांची संख्या कमी होत आहे. त्यामुळे ओघानेच शिकार मिळत नसल्याने वाघ/बिबट्यांचा गावांमधील प्रवेश वाढतोय.माहिती, ज्ञान यात गल्लत मराठी भाषेत निसर्गाविषयीचे पुरेसे कोश नाहीत. पाठ्यपुस्तकात निसर्गाचा समावेश नाही. मराठीत वेगवेगळ्या विषयावर विपुल लेखन व्हायला हवे; पण ते होत नाही. आपल्याकडे ज्या गोष्टी आहेत त्याचा पुरेपूर वापर झाला पाहिजे. इस्रायलकडे बघा. त्यांनी हिब्रू भाषेत विपुल ग्रंथसंपदा निर्माण केली आहे. भाषेत शब्दसंपत्ती आली पाहिजे, असे झाले तरच भाषा समृद्ध होईल. नवी मुले लिहित नाहीत, त्यांना मराठीही नीट येत नाही, शुद्धलेखन जमत नाही. त्यामुळे माहिती आणि ज्ञान यात गल्लत झाली आहे.मी जेव्हा नांदेडला होतो, तेव्हा नरहर कुंरुदकर या मोठ्या समीक्षकाशी गाठभेट झाली. तेव्हा मी एक लेख लिहिला होता, तो लेख मी त्यांना दिला. विशेष म्हणजे, मी लिहिलेला लेख त्यांनीच पुन्हा लिहिला आणि मला लेखन कसे करायचे? याबाबत मार्गदर्शन केले.(मुलाखत : प्रतिनिधी)
नायकरूपी निसर्गाने साहित्य समृद्ध व्हावे
By admin | Published: March 19, 2017 1:06 AM