नवी दिल्ली: राष्ट्रवादीचे नेते आणि महाराष्ट्र सरकारमधील अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्याकडून सातत्याने होत असलेल्या आरोपानंतर एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे आज(1 नोव्हेंबर, सोमवार) दिल्लीत दाखल झाले. त्यांनी राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाचे(NCSC) अध्यक्ष सुभाष रामनाथ पारधी यांची भेट घेतली. त्यापूर्वी एनसीएससीचे उपाध्यक्ष अरुण हलदर यांनी रविवारी समीर वानखेडे यांच्या घरी त्यांची भेट घेतली. तसेच, समीनर यांचा जातीचा दाखला तपासला आणि समीर यांना क्लीन चिट दिली होती.
दिल्लीत राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाच्या अध्यक्षासोबत झालेल्या या बैठकीनंतर समीर वानखेडे म्हणाले, "आयोगाने माझ्याकडून जे काही तथ्य आणि कागदपत्रे मागितली होती, ती मी सादर केली आहेत. माझ्या तक्रारीची चौकशी केली जाईल आणि लवकरच आयोगाचे अध्यक्ष त्याचे उत्तर देतील. समीर वानखेडे यांनी घटस्फोट, विवाह प्रमाणपत्र, अनुसूचित जातीचे प्रमाणपत्र आणि त्यांच्या पहिल्या पत्नीकडून झालेल्या मुलाचा जन्म दाखला यासंबंधीची कागदपत्रे एससी आयोगासमोर सादर केली. या बैठकीबाबत एनसीएससीचे अध्यक्ष सुभाष रामनाथ पारधी म्हणाले, “समीर वानखेडे हे आयोगासमोर संबंधित मुद्दे मांडण्यासाठी आले होते. आम्ही त्यांनी सादर केलेल्या कागदपत्रांची तपासणी करू आणि त्यांची पडताळणी करू.
...तर राष्ट्रपतींकडे तक्रार करणार- नवाब मलिक
नवाब मलिक यांनी आज पुन्हा समीर वानखेडे यांच्यावर आरोप केला की, ते मुस्लिम असून त्यांनी बनावट जात प्रमाणपत्राच्या आधारे आरक्षणाचा लाभ घेतला आणि आयआरएसची नोकरी मिळवली. एनसीएससीचे उपाध्यक्ष अरुण हलदर आणि वानखेडे यांच्यातील बैठकीला नवाब मलिक यांनी आक्षेप घेतला. ते म्हणाले, अरुण हलदर हे भाजपचे नेते आहेत, पण ते वैधानिक पदावर बसलेले आहेत. त्यांनी आपल्या पदाची प्रतिष्ठा जपली पाहिजे. ते समीर वानखेडे यांच्या घरी जाऊन त्याची कागदपत्रे तपासतात आणि क्लीन चिट देतात. पण, त्यांना क्लीन चिट देण्याचा अधिकार नाही. मी त्यांच्याविरोधात राष्ट्रपतींकडे तक्रार करणार आहे.
नॅशनल कमिशन फॉर शेड्युल्ड कास्ट (NCSC) चे उपाध्यक्ष अरुण हलदर यांनी समीर वानखेडे यांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली होती. यानंतर ते म्हणाले होते, 'मी एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांची कागदपत्रे पाहिली आहेत. वानखेडे यांनी कधीही धर्म बदलल्याचे दिसून येत नाही. दुसरीकडे नवाब मलिक यांनी या क्लीन चिटवर प्रश्न उपस्थित केले असून राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाचे उपाध्यक्ष आणि भाजप नेते अरुण हलदर यांच्याविरोधात राष्ट्रपतींकडे तक्रार करण्याची घोषणा केली आहे. नवाब मलिक म्हणाले- रविवारी राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाचे उपाध्यक्ष आणि भाजप नेते अरुण हलदर यांनी समीर वानखेडे यांच्या घरी भेट दिली. यादरम्यान त्यांनी समीर यांना क्लीन चिटही दिली. त्यांनी आधी या प्रकरणाची चौकशी करून सविस्तर अहवाल सादर करायला हवा होता. त्यांची तक्रार आम्ही राष्ट्रपतींकडे करू.