“जाहिरात देणारा हितचिंतक कोण? भाजप मंत्र्यांचे फोटो का टाकले नाहीत? किती खर्च...”: अजित पवार
By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2023 03:58 PM2023-06-14T15:58:58+5:302023-06-14T15:59:28+5:30
Ajit Pawar News: ज्या नऊ मंत्र्यांची माळ लावली, त्यातील ५ वादग्रस्त आहेत. अशा मंत्र्यांच्या कारभारावर पांघरुण घालण्याचा प्रयत्न तुम्ही केला आहे का, अशी विचारणा अजित पवारांनी केली.
Ajit Pawar News: ‘राष्ट्रामध्ये मोदी, महाराष्ट्रात शिंदे’ या टॅगलाईनखाली एक जाहिरात देण्यात आली होती. यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या व्यक्तिरिक्त कोणाही अन्य नेत्याचा फोटो देण्यात आला नव्हता. लगेच दुसऱ्या दिवशी भाजप आणि शिवसेना शिंदे गटातील नेत्यांचा समावेश असलेली नवी जाहिरात देण्यात आली. यावरून महाविकास आघाडीचे नेते टीकास्त्र सोडताना दिसत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी या प्रकरणी प्रश्नांची सरबत्ती केली आहे. जाहिरात देणारा हितचिंतक कोण? भाजप मंत्र्यांचे फोटो का टाकले नाहीत, असे अनेक प्रश्न विचारले आहेत.
इतक्या प्रचंड खर्चाच्या जाहिराती देणारा शिवसेनेचे हितचिंतक कोण आहे? जाहिरातीबाबत आम्ही उपस्थित केलेल्या प्रश्नांची उत्तरं त्यांनी द्यायला पाहिजे होती. नवी जाहिरात म्हणजे आधीच्या चुका दुरुस्त करण्याचा प्रयत्न आहे. यामध्ये तुम्ही भाजप आणि शिवसेनेचा जाहिरातीत उल्लेख केला आहे तर मग फक्त शिवसेनेच्या ९ मंत्र्यांची खाली माळ लावली आहे. भाजपच्या मंत्र्यांचे फोटो का टाकले नाहीत, अशी विचारणा अजित पवार यांनी केली.
वादग्रस्त मंत्र्यांच्या कारभारावर पांघरुण घालण्याचा प्रयत्न तुम्ही केला आहे का?
ज्या नऊ मंत्र्यांची माळ लावली आहे, त्यातील ५ मंत्री हे वादग्रस्त आहेत. दोन दिवसांपासून यांच्याविरोधात माध्यमातून सातत्यानं बातम्या सुरु आहेत. मग अशा वादग्रस्त मंत्र्यांच्या कारभारावर पांघरुण घालण्याचा प्रयत्न तुम्ही केला आहे का, असा सवाल अजित पवार यांनी केला. तसेच शिवसेनेच्या एका मंत्र्याने सांगितले की, त्यांच्या एका हितचिंतकाने जाहिरात दिली. कोण हितचिंतक आहे? पहिल्या पानावर महत्वाच्या अनेक पेपरला जाहिराती दिल्या जातात. या जाहिरातीला किती खर्च येतो हे सर्वांना माहिती आहे. हा हितचिंतक कोण आहे? त्याच्याकडे कशा पद्धतीने पैसा आला आहे, असा रोकडा सवालही अजित पवार यांनी केला.
दरम्यान, तुमच्या सरकारबद्दल तुम्हाला इतका आत्मविश्वास असेल. जनतेचे पाठबळ आहे, असे तुम्हाला वाटत असेल तर जाहिरातीच्या माध्यमातून तुम्ही ते दाखवू इच्छित असाल तर निवडणुकीला सामोरे जा. तुम्हाला मुख्यमंत्रीपदे मिळाली, पण २३ जागा रिकाम्या आहेत त्याबद्दल तुम्ही का बोलत नाही? असा प्रश्नही अजित पवार यांनी उपस्थित केला.