Maharashtra Politics: गेल्या अनेक दिवसांपासून एकामागून एक गौप्यस्फोटांची मालिका सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहाटेच्या शपथविधीवरून केलेल्या गौप्यस्फोटानंतर अनेक आरोप-प्रत्यारोप झाले. यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस नेते आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आता एक गौप्यस्फोट केला आहे. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून बंडखोरी केल्यानंतर त्यांना मुख्यमंत्री करण्यात आले. मात्र, यानंतर भाजपचे ८० ते ८५ आमदार बंडाच्या तयारीत होते, असा मोठा दावा अजित पवारांनी केला आहे.
एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर ८० भाजप आमदार बंड करणार होते. देवेंद्र फडणवीस यांनी हे बंड थांबवले, असे अजित पवार म्हणाले. भाजपच्या सर्व आमदारांना वाटत होते की, मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे शपथ घेणार. त्यावेळेचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना भेटायला गेलो होतो. तेव्हा ते म्हणाले, अजितजी ऐ क्या हुवा, अक्षरक्षा असे वाक्य त्यावेळी माझ्या कानावर आले. मी मंत्रिमंडळात जाणार नाही, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले होते. त्यावेळी कुणाच्या डोळ्याच पाणी आले हे गिरीश महाजन यांना चांगल माहिती आहे, असा टोला अजित पवारांनी लगावला.
काही जण म्हणाले ८०-८५ आमदारांनी बंड करायचे का?
त्यावेळी काय करायचे अशी चर्चा भाजप आमदारांमध्ये झाली. काही जण म्हणाले ८०-८५ आमदारांनी बंड करायचे का? त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, असे काही करु नका. त्या दोघांना (अमित शाह-नरेंद्र मोदी) कळले तर आपला सुपडा साफ होईल, असे फडणवीसांनी सांगितले. वरून आदेश आले आहेत सर्वांनी आदेशाचे पालन करायचे आहे, असे फडणवीस म्हणाले, असा दावा अजित पवार यांनी केला.
दरम्यान, सरकार स्थापन झाले, त्यावेळी दोघांनी राज्य चालवले. ते म्हणत होते आम्ही खंबीर आहोत. त्यानंतर मंत्रिमंडळ वाढले. मात्र ८ महिने झाले तरी पूर्ण मंत्रिमंडळ झाले नाही. महिलांना मंत्रिमंडळात स्थान दिले नाही, अशी टीका अजित पवार यांनी केली.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"