Maharashtra Politics: “राज्यातील शेतकरी संकटात, पण स्वत:चे हसरे चेहरे दाखवण्यासाठी करोडोंचा चुराडा”
By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2023 05:32 PM2023-02-26T17:32:08+5:302023-02-26T17:33:09+5:30
Maharashtra News: राज्याच्या अर्थसंकल्पी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला अजित पवारांची शिंदे-फडणवीस सरकारवर टीका.
Maharashtra Politics: एकीकडे राज्यात अनेकविध मुद्द्यांवरून राज्यातील राजकारण तापलेले असताना दुसरीकडे राज्याच्या अर्थसंकल्पी अधिवेशनाला सुरुवात होत आहे. अर्थसंकल्पी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला विरोधी पक्षांचे शिष्टमंडळ राज्यपाल बैस यांची भेट घेणार असल्याचे सांगितले जात आहे. यातच चहापानाच्या कार्यक्रमावर विरोधक बहिष्कार घातला आहे. या पार्श्वभूमीवर विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर सडकून टीका केली आहे.
राज्यातील शेतकरी संकटात असताना दुसरीकडे स्वत: सरकार स्वत:चे हसरे चेहरे दाखवण्यासाठी करोडोंचा चुराडा करत असल्याची घणाघाती टीका अजित पवार यांनी केली आहे. महाराष्ट्रातील विविध ठिकाणी फिरत असताना लोकांनी आपली कैफियत मांडली. शेतकऱ्यांना सरकारकडून जाहीर केलेली मदत अद्यापही मिळाली नाही. शेतकरी आत्महत्येत वाढ होत असल्याकडे अजित पवार यांनी लक्ष वेधले.
वाढत्या महागाईमुळे शेती उत्पादन खर्च वाढला
वाढत्या महागाईमुळे शेती उत्पादन खर्च वाढला आहे. पण त्या तुलनेत शेतमालाला भाव मिळत नसल्याचे त्यांनी सांगितले. सोलापूरमधील शेतकऱ्याला कांदा विक्री केल्यानंतर अवघ्या दोन रुपयांचा चेक मिळाला. कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे प्रश्न गंभीर होत चालला आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी कांद्यांला चांगला भाव सरकारने जाहीर करून निर्यात वाढवण्यासाठी तातडीने पावले उचलली पाहिजे, अशी मागणी अजित पवार यांनी केली.
दरम्यान, जाहिरातींवर ५० कोटी सरकारने खर्च केले आणि मुंबई महापालिकेने १७ कोटी रुपये जाहिरातींवर खर्च केले आहेत. आपले हसरे चेहरे दाखवण्यासाठी ही उधळपट्टी सुरू आहे. एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना वेतन वेळेवर मिळत नाही आणि दुसरीकडे महामंडळाच्या पानभर जाहिराती प्रसिद्ध होत आहे. हा प्रकार चिड आणणारा आहे, अशी टीका अजित पवारांनी केली.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"