Ajit Pawar : "नव्या राजकीय समीकरणांच्या चर्चा पण..."; अजित पवारांनी अखेर मौन सोडलं
By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2023 11:31 AM2023-04-18T11:31:36+5:302023-04-18T11:46:32+5:30
NCP Ajit Pawar : अजित पवारांबरोबर सध्या 15 च्या आसपास आमदार जायला तयार आहेत, यात पक्षातील काही बड्या नेत्यांचाही समावेश आहे. हा आकडा वाढण्याची शक्यता आहे. असं असताना यावर आता अजित पवारांनी मोठं भाष्य केलं आहे.
राष्ट्रवादीचे नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार भाजपसोबत जाणार, या चर्चेने पुन्हा एकदा जोर धरला. ही चर्चा रंगली असताना याच दरम्यान एक महत्वाची माहिती समोर आली आहे. अजित पवारांबरोबर सध्या 15 च्या आसपास आमदार जायला तयार आहेत, यात पक्षातील काही बड्या नेत्यांचाही समावेश आहे. हा आकडा वाढण्याची शक्यता आहे. असं असताना यावर आता अजित पवारांनी मोठं भाष्य केलं आहे. हे वृत्त फेटाळलं आहे. नव्या राजकीय समीकरणांच्या फक्त चर्चा आहेत, त्यात काही तथ्य नाही असं म्हटलं आहे. एबीपी माझाशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली आहे.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत सासवड (जि. पुणे) येथे आयोजित शेतकरी मेळाव्याला ते जाणार होते. मात्र, हा कार्यक्रम रद्द करून ते मुंबईतच थांबले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या 53 आमदारांपैकी 40 आमदारांच्या सह्या घेतल्या असल्याची चर्चा रंगली आहे. तसेच या आमदारांच्या सह्याचं पत्र घेऊन अजित पवार राज्याचे राज्यपाल यांना भेटण्याची चर्चा देखील रंगली आहे. अजित पवार विधानभवन परिसरात रवाना झाले असून तिथे ते काही आमदारांची भेट घेणार असल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळे राजकीय घडामोडींना वेग आला आहे.
"15 दिवसांत दोन मोठी राजकीय घडामोड घडणार"
राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी आगामी 15 दिवसांत दोन मोठी राजकीय घडामोड घडणार आहे. यामधील एक दिल्लीत आणि एक महाराष्ट्रात होणार असल्याचा दावा सुप्रिया सुळे यांनी केला आहे. सुप्रिया सुळेंच्या या दाव्यानं राजकारणात पुन्हा एकदा खळबळ माजली आहे. सुप्रिया सुळे यांना आजित पवार कुठे आहे असे विचारण्यात आले. यावर 'तुम्ही सर्व चॅनलवाल्यांनी अजितदादांच्या मागे एक युनिट लावावे. राज्यात अनेक समस्या आहेत, राज्यात चुकीच्या पद्धतीने काम सुरू आहे, असं सुप्रिया सुळे यांनी सांगितले.
"अजित पवार भाजपासोबत जाणार का?"
अजित पवार भाजपासोबत जाणार का?, असा सवालही सुप्रिया सुळेंना विचारण्यात आला. यावर 'हे दादांनाच विचारा...मला गॉसिपसाठी वेळ नाही, लोकप्रतिनिधी म्हणून माझ्याकडे खूप काम आहे, त्यामुळे मला त्याची माहिती नाही. पण कष्ट आणि मेहनत करणारा नेता असल्याने अजितदादा सर्वांनाच आवडतात. त्यामुळे अशी विधाने केली जातात, असं स्पष्टीकरण सुप्रिया सुळेंनी दिलं. अजित पवारांनी हा खुलासा केला असला तरी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण कायम आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"