NCP Ajit Pawar ( Marathi News ) : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सध्या राज्यात जनसन्मान यात्रेचं आयोजन केलं आहे. या यात्रेच्या माध्यमातून अजित पवार यांच्याकडून मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या अनुषंगाने महिलांशी संवाद साधला जात आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार आणि त्यांच्या राष्ट्रवादी पक्षाचाही मेकओव्हर झाला असून गुलाबी रंगाचा वापर ठळकपणे केला जात आहे. या मेकओव्हरबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना अजित पवार यांनी जाहीरपणे एक कबुलीही दिली आहे.
"तुम्ही मागील काही दिवसांपासून महिलांशी संवाद साधत आहात. तुमच्या मेकओव्हरची महाराष्ट्रात चांगलीच चर्चा रंगत आहे. त्यावर तुमचं काय मत आहे?, " असा प्रश्न 'मुंबई तक'च्या मुलाखतीदरम्यान अजित पवार यांना विचारण्यात आला होता. त्यावर अजित पवार म्हणाले की, "राष्ट्रवादी काँग्रेसचा अध्यक्ष म्हणून जबाबदारी स्वीकारण्याआधी मी आदरणीय नेते पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली काम करत होतो. जेव्हा तुम्ही एखाद्या वडीलधाऱ्या नेत्याच्या नेतृत्वाखाली काम करता तेव्हा तुमच्यावर जबाबदारी नसते. ज्यावेळी तुमच्यावर जबाबदारी येते तेव्हा तुमच्या प्रत्येक गोष्टीकडे आजूबाजूच्या लोकांचं बारकाईने लक्ष असतं. आधी माझ्याकडून एखादी चूक झाली तरी साहेब ते सावरून घ्यायचे किंवा एखादं स्टेटमेंट देऊन त्यातून मार्ग निघायचा. मात्र आता तोलून मापून बोलण्याची माझ्यावर जबाबदारी आहे," अशी कबुली अजित पवारांनी दिली आहे.
"लोकांमध्ये गेल्याशिवाय त्यांच्या मनातील कळणार नाही"
जनसन्मान यात्रेविषयी पुढे बोलताना अजित पवार म्हणाले की, "मी मागील ३५ वर्षांपासून सामाजिक आणि राजकीय जीवनात आहे. सुरुवातीचा काळ आपला असतो मात्र नंतर आपल्याही लक्षात येतं की नेमकं कसं वागलं पाहिजे, कसं बोललं पाहिजे. मला एखादा निर्णय घेत असताना लोकांच्या मनात काय चाललंय हे समजून घेण्यासाठी लोकांमध्ये मिसळल्याशिवाय कळणार नाही. त्यामुळे मी आता लाडकी बहीण योजनेच्या निमित्ताने महिलांमध्ये मिसळत आहे."
दरम्यान, अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने राज्यात जनसन्मान यात्रा काढलेली असताना दुसरीकडे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षानेही शिवस्वराज्य यात्रेच्या माध्यमातून महाराष्ट्र पिंजून काढण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत या दोन्ही पक्षांमध्ये रंगतदार सामना पाहायला मिळण्याची शक्यता आहे.