“जयंत पाटलांसह आठ आमदार अजितदादांच्या गटात येतील”; NCPच्या बड्या नेत्याचा मोठा दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2023 04:48 PM2023-10-20T16:48:55+5:302023-10-20T16:53:04+5:30
NCP Ajit Pawar Group: येत्या सात ते आठ दिवसांत नेमके कोण कुठल्या गटाच्या संपर्कात आहेत, हे स्पष्ट होईल, असे अजित पवार गटातील नेत्यांनी म्हटले आहे.
NCP Ajit Pawar Group: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर कुणाच्या गटात नेमके किती आमदार आहेत, कुणाच्या बाजूने किती जण आहे, यावरून अनेक दावे-प्रतिदावे केले जात आहेत. यातच आता जयंत पाटील यांनी केलेल्या दाव्यावर अजित पवार गटातील नेत्यांनी उत्तर देताना प्रतिदावा केला आहे. जयंत पाटील यांच्यासह शरद पवार गटातील आठ आमदार अजित पवार गटात येतील. तसेच कोण कुठल्या गटाच्या संपर्कात आहेत, हेही येत्या काही दिवसांत कळेल, असे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातील नेत्यांनी केला आहे.
अजित पवार यांच्या गटातील अनेक आमदार शरद पवारांच्या संपर्कात आहेत. परंतु, त्याच्या खोलात जाणार नाही. कारण त्यांची अडचण होऊ नये असे मला वाटते. त्यांची काही कामे आहेत जी झाली पाहिजेत. त्यांच्या मार्गात अडथळा निर्माण करणार नाही. योग्य वेळी आली की आपण पाहू. तसेच ही मंडळी परत आली तर त्यांना पक्षात परत घ्यायचे की नाही याबाबतचा निर्णय शरद पवार घेतील. अंतिम निर्णय त्यांचाच असेल. मात्र अजित पवार गटातल्या आमदारांची परत येण्याची इच्छा आहे, असा दावा जयंत पाटील यांनी केला होता. यावर अमोल मिटकरी यांनी प्रतिक्रिया दिली.
दावा कितपत खरा आहे हे थोड्याच दिवसात स्पष्ट होईल
जयंत पाटील हे मोठे नेते आहेत. परंतु, त्यांचा दावा कितपत खरा आहे हे थोड्याच दिवसात स्पष्ट होईल. येत्या २५-२६ ऑक्टोबरपर्यंत जयंत पाटील यांचे वक्तव्य किती खरे आहे ते स्पष्ट होईल. आमचे १५ आमदार त्यांच्या संपर्कात आहेत की त्यांचाच मोठा नेता आमच्या संपर्कात आहे याचे खरे चित्र लवकरच महाराष्ट्रासमोर येईल, असे अमोल मिटकरी यांनी म्हटले आहे.
दरम्यान, अजित पवार गटाचे नेते तथा राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री धर्माराव आत्राम यांनी दावा केला आहे की जयंत पाटीलच आमच्या संपर्कात आहेत. आमच्याबरोबर एकूण ४५ आमदार आहेत. सध्या कोणीही शरद पवारांच्या संपर्कात नाही. उलट त्यांच्याकडचे काही आमदार आमच्या वरिष्ठ नेत्यांच्या संपर्कात असून सध्या त्यांची बोलणी सुरू आहे. जयंत पाटील यांच्यासह आठ अमदार अजित पवार गटात येतील, असे आत्राम यांनी म्हटले आहे.