NCP Ajit Pawar Group Vs Sharad Pawar Group: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील गट हाच खरा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे, असा महत्त्वपूर्ण निर्णय निवडणूक आयोगाने घेतला. तसेच पक्षाचे नाव व घड्याळ हे निवडणूक चिन्ह अजित पवारांच्या गटाला देण्यात आले आहे. या निर्णयामुळे शरद पवार यांच्या गटाला मोठा राजकीय धक्का बसला आहे. यानंतर अजित पवार गटाकडून सर्वोच्च न्यायालयात कॅव्हेट याचिका दाखल करण्यात आली आहेत. यातच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यालय ताब्यात घेण्याची सुरू करण्यात आल्याचे सांगितले जात आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते अमोल मिटकरी यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाने दिलेल्या निकालावर प्रतिक्रिया दिली. यावेळी कार्यालय ताब्यात घेण्याबाबत काही सूचक विधाने केली. अमोल मिटकरी म्हणाले की, राष्ट्रवादी पक्ष कार्यालये ताब्यात घेण्याबाबत अजून आदेश नाहीत. वरिष्ठ पातळीवरून आदेश आले की, लगेच पक्ष कार्यालये ताब्यात घेऊ. सध्या पक्ष चिन्ह आम्हाला मिळाले, त्यामुळे आपसूक पक्ष कार्यालयेही आमच्या बाजूला येईल.
जितेंद्र आव्हाडांनी मुंब्रा हातात राहतो का पाहावे
केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवार गटावर टीका केली होती. या टीकेला अमोल मिटकरी यांनी उत्तर दिले. मला पक्षाचा वरिष्ठांनी सांगितले आहे की, त्यांच्यावर बोलू नका. अजित पवार यांच्या विरोधात एक टोळके काम करत होते, त्याचा म्होरक्या जितेंद्र आव्हाड आहे. त्यांनी मुंब्रा हातात राहतो का हे पाहावे, असा पलटवार मिटकरींनी केला. काही लोकांना कामधंदे राहिलेले नाहीत. संजय राऊत म्हणा किंवा मुंब्राच्या भाई म्हणा… या सगळ्यांना कुठलेही कामधंदे राहिलेले नाहीये. त्यामुळे त्यांना काय बडबड करायची ते करू द्या, असा टोलाही मिटकरींनी लगावला.
दरम्यान, शरद पवार गटातील सहा नेते आता लवकरच आमच्याकडे येतील. काही जणांसाठी मंत्रिपद रिक्त ठेवण्यात आलेली आहेत. जेव्हा ते येतील त्यावेळी एक मोठी गोष्ट पुन्हा महाराष्ट्र पाहणार आहे, असा दावा मिटकरींनी केला.