लक्षद्वीपमध्ये ‘घड्याळ’ चिन्हावरच राष्ट्रवादी काँग्रेस लढणार; आनंद परांजपे यांनी केले स्पष्ट
By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2024 03:01 PM2024-03-29T15:01:37+5:302024-03-29T15:03:10+5:30
NCP Ajit Pawar Group: राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या उमेदवारांना अरुणाचल प्रदेश विधानसभा आणि लक्षद्वीपमध्ये लोकसभा निवडणुकीत घड्याळ हेच चिन्ह मिळणार आहे.
NCP Ajit Pawar Group: लक्षद्वीप येथे लोकसभेसाठी आमच्या उमेदवारांना 'घड्याळ' हेच चिन्ह मिळणार आहे त्यामुळे कुणीही चुकीच्या माहितीवर आधारीत गैरसमज पसरवू नये, अशी विनंती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते आणि ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांनी केली आहे.
टप्प्यात आल्यावर करेक्ट कार्यक्रम करायचा असतो असे शरदचंद्र पवार गटाचे ज्येष्ठ नेते बोलतात पण खोडसाळपणे चुकीच्या माहितीवर कार्यक्रम करायला गेल्यावर 'इनकरेक्ट' कार्यक्रमच होतो हे ज्येष्ठ नेत्यांनी लक्षात ठेवावे असा टोला आनंद परांजपे यांनी यावेळी लगावला. लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीला लक्षद्वीप येथे घड्याळ हे चिन्ह मिळणार नाही अशा बातम्या प्रसारित झाल्या आहेत त्यावर आनंद परांजपे यांनी ठाणे येथे माध्यमांशी संवाद साधला.
राष्ट्रवादी काँग्रेस हा महाराष्ट्र आणि नागालॅंडमध्ये मान्यताप्राप्त राज्यस्तरीय पक्ष असून पक्षाकडून केंद्रीय निवडणूक आयोगाकडे अर्ज केला होता. अरुणाचलप्रदेश येथे होणाऱ्या विधानसभेच्या सर्व जागांवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व उमेदवारांना घड्याळ हे चिन्ह मिळणार आहे. त्याचप्रमाणे लक्षद्वीप येथे होणार्या लोकसभेच्या निवडणूकीत उमेदवारांना 'घड्याळ' हेच चिन्ह मिळणार आहे. तशाप्रकारची अधिसूचना २३ मार्च रोजी अरुणाचलप्रदेशबद्दल निवडणूक आयोगाने काढली आहे आणि लक्षद्वीपबद्दल २४ मार्च रोजी अधिसूचना काढण्यात आली हेही आनंद परांजपे यांनी सांगितले.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांना विधानसभा निवडणुकीत अरुणाचल प्रदेशमध्ये आणि लक्षद्वीपमध्ये लोकसभा निवडणुकीत घड्याळ हेच चिन्ह मिळणार आहे. त्यामुळे कुठल्याही प्रकारचा गैरसमज माध्यमांनीही पसरवू नये अशी विनंती आनंद परांजपे यांनी केली आहे.